शिवराम हरी राजगुरू

`शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला.

सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली.

लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती