आपले राष्ट्रीय अलंकार आपला देशाभिमान, याबद्दल माहिती असायलाच पाहिजे

सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (21:28 IST)
देशाची गौरवचिन्हे आणि मानबिंदू म्हणजे जणू राष्ट्रीय अलंकारच असतात. त्यांच्या जपणुकीतून आपला देशाभिमानच जोपासला जातो. आपले राष्ट्रीय अलंकार असे आहेत..? राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह दिसतात.) त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे. घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५0 रोजी हे राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.
 
राष्ट्रध्वज
तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. उंची दोन भाग, तर लांबी तीन भाग या प्रमाणात तिरंगा बनवला जातो. उंचीचे समान तीन भाग बनवू. सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद (पांढरा) व खालचा भाग हा हिरवा रंगात बनविला जातो. मधल्या भागामध्ये गडद निळय़ा रंगातील अशोक चक्र असते. या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्टय़ाच्या उंचीच्या तीन-चतुर्थ्यांश असतो. या चक्राला २४ आरे असतात. राष्ट्रध्वजाच्या प्रत्येक रंगातून तसेच चक्रातून एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो. भगवा- एकात्मता, सफेद- सत्याचा मार्ग, हिरवा- निसर्गाशी व जीवनाशी नाते, अशोक चक्र - धर्माचे नियम, आरे - प्रगती, वेग, विकासाचे प्रतीक.
 
तिरंग्यांचा इतिहास
भारताच्या स्वातंत्र्यलढय़ावेळी भारतीयांना सतत प्रेरणा मिळत राहणे आवश्यक होते. त्यासाठी झेंडा हे प्रतीक सवरेत्तम असल्याचे मानले गेले. १९0४ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांनी प्रथम एक झेंडा बनविला. तो पुढे निवेदितांचा झेंडा म्हणून ओळखला जाऊ लागला. चौरस आकाराच्या या लाल झेंड्यामध्ये मध्यभागी पिवळय़ा रंगातील वज्रचिन्ह, कमळ होते, तसेच बंगाली भाषेत 'वंदे मातरम्' हे शब्दही होते. ७ ऑगस्ट १९0६ रोजी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथील पारसी बगान चौकात सचिंद्रप्रसाद बोस यांनी एका निषेध मोर्चामध्ये हा झेंडा फडकविला. त्यावेळी या झेंड्याला 'कलकत्ता झेंडा' असे नाव पडले.

भगवा, पिवळा व हिरवा या रंगांतील समान आकाराचे पट्टे या झेंड्यावर होते. वरच्या भगव्या पट्टीमध्ये अर्धी उघडलेली, आठ कमळाची फुले होती, तसेच सूर्य व खालच्या पट्टीत चंद्राची कोर होती.२२ ऑगस्ट १९0७ रोजी र्जमनीतील स्टुटगार्ट शहरात भिकाजी कामा यांनी आणखी एक तिरंगा फडकविला. या तिरंग्यामध्ये वरची पट्टी हिरवी, मधली पट्टी भगवी, तर खालची लाल रंगाची होती. यामध्ये हिरवा रंग हा इस्लामचा, तर भगवा रंग हा हिंदू व बौद्ध धर्माचे प्रतीक असल्याचे मानले गेले. हिरव्या पट्टय़ामध्ये असलेली आठ कमळ फुले त्यावेळच्या ब्रिटिश हिंदुस्थानातील आठ प्रांतांची प्रतीके होती. मधल्या पट्टय़ात देवनागरीमध्ये 'वंदे मातरम्' लिहिलेले होते. खालच्या पट्टय़ात एकीकडे चंद्रकोर, तर दुसरीकडे सूर्य होता. भिकाजी कामा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा या तिघांनी हा झेंडा बनविला होता. पहिल्या महायुद्धादरम्यान हा झेंडा 'बर्लिन कमिटी फ्लॅग' म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९१६ मध्येच आंध्र प्रदेशातील मचलीपट्टणमधील पिंगळ्ळी वेंकय्या यांनी राष्ट्रीय झेंड्याची रचना बनविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना दाद देत उमर सोबानी आणि एस. बी. बोमनची यांनी भारतीय राष्ट्रीय झेंडा मोहीम हाती घेतली. गांधीजींच्या सूचनेप्रमाणे वेंकय्यांनी लाल आणि हिरव्या रंगामध्ये चक्र बनवून झेंडा तयार केला. मात्र, या झेंड्यावर अनेकांनी टीका केली. शेवटी १९३१ मध्येच कराचीमधील बैठकीत काँग्रेस पिंगळ्ळी वेंकय्या यांनी बनविलेला तिरंग्याला मान्यता दिली. म्हणूनच, पिंगळळी वेंकय्या यांना तिरंग्याचे जनक असे म्हटले जाते.

वेंकय्या एक उत्तम लेखक, भूशास्त्रज्ञ आणि जपानी भाषेचे व्याख्याते होते. आंध्र प्रदेशातील (सध्याच्या कृष्णा जिल्ह्यातील) भाटलपेन्नुमारू या खेडेगावात २ ऑगस्ट १८७६ रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी विविध देशांच्या झेंड्यांचा अभ्यास केला. त्यातूनच त्यांना भारतीय तिरंग्याची कल्पना सुचली. यामध्ये भगवा (साहस), सफेद (सत्य व शांती) आणि हिरवा (विश्‍वास व प्रगती) या रंगांचा समावेश होता, तसेच सफेद भागावर चक्र होते. स्वातंत्र्यपूर्वी, स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय झेंडा काय असावा, याविषयी २३ जून १९४७ रोजी एक समिती स्थापन झाली. १४ जुलै १९४७ रोजी या समितीने सर्वांना मान्य असलेला तिरंगा मान्य केला आणि असा हा भारताचा राष्ट्रीय झेंडा सर्वप्रथम १५ ऑगस्ट १९४७ रोजी फडकविण्यात आला.

१५ ऑगस्ट २00७ रोजी त्याला साठ वर्षे पूर्ण झाली. एकीचे बळ शिकविणारा, मान ताठ करायला शिकविणारा आणि प्रत्येक भारतीयांचा अभिमान असणारा असा हा तिरंगा आहे.
 
राष्ट्रध्वज संहिता..
आपला राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा देशाच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा अवमान होऊन नये याकरिता 'राष्ट्रध्वज संहिता' बनविण्यात आली आहे. विविध नियम करण्यात आले आहेत, तर त्याच्या चुकीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा कायद्याचा गुन्हेगार तर आहेच किंबहुना देशद्रोही आहे.
 
भारताच्या महानतेचे प्रतीक असणार्‍या या तिंरग्याची आचारसंहिता १९६४ साली सी. व्ही. वारद यांनी लिहिली. ध्वजारोहण, अभिवादन, ध्वजावतरण आणि ध्वजाचा सन्मान कसा करावा, याबाबत एक नियमावली बनविण्यात आली. त्यालाच 'राष्ट्रध्वज संहिता' असे म्हणतात.
 
आपला तिरंगा हा विशिष्ट आकाराचा अन् विशिष्ट वस्त्रापासून (खादीचे कापड) तयार केलेला असावा. सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग असावा. राष्ट्रध्वज नेहमी उंच जागीच लावावा. तो सूर्याेदय आणि सूर्यास्त या काळातच लावावा. आरोहणाच्या वेळी तो त्वरित वर चढवावा आणि ध्वजावतरणाच्या वेळी हळू हळू उतरावा. ध्वज हा पूर्णपणे वर चढवावा. ध्वज वर चढविल्यानंतर वरील बाजूस जागा शिल्लक असता कामा नये. ध्वजाच्या उजव्या बाजूस उभे राहावे. 
 
ध्वजाचा स्पर्श जमिनीशी होऊ नये. अन्य कोणताही झेंडा राष्ट्रध्वजापेक्षा कमी उंचीवर फडकविण्यात येतो. अन्य ध्वजाच्या स्तंभांची उंची राष्ट्रीय ध्वजस्तंभापेक्षा कमी असते.
 
राष्ट्रीय प्राणी (पशू)
'पॅंथेरा टायग्रीस' असे शास्त्रीय नाव असलेले 'वाघ' हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
 
राष्ट्रीय पक्षी
'पॅओ क्रिस्टॅटस' असे नाव असलेला 'मोर' हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. भारतीय उपखंडात मोर सर्वत्र आढळतो.
 
राष्ट्रीय फूल
'नेल्यूंबो न्यूसीफेरा' असे शास्त्रीय नाव असलेले 'कमळ' हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे.
 
राष्ट्रभाषा
स्वातंत्र्याचे हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ण केलेल्या भारतात राष्ट्राचा अभिमान स्पष्ट करणार्‍या अनेक गोष्टी आहेत. 'तिरंगा' हा आपला राष्ट्रध्वज आहे. रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेले 'जनगणमन' हे आपले राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीताइतकाच मान बंकिमचंद्र चटर्जींच्या 'वंदे मातरम्'लाही आहे. 'शकयुगाचे पंचांग' हे आपले राष्ट्रीय पंचांग आहे. 'वाघ' हा आपला राष्ट्रीय पशू आहे. 'मोर' हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे; तर 'कमळ' हे आपले राष्ट्रीय फूल आहे. तद्वतच 'हिंदी' ही आपली राष्ट्रभाषा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती