अन् पैलवानाला तेल कमी पडलं ! उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (15:24 IST)
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या संपादकीयच्या माध्यमातून विश्लेषण केलं असून महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा निकाल ‘ईव्हीएम मधून बाहेर आला असल्याचं म्हटलं आहे. ‘ईव्हीएम’ मधून फक्त कमळच बाहेर येतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता. पण १६४ पैकी ६३ ठिकाणी कमळे फुलली नाहीत असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.
 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं ‘अब की बार, २२० पार’ अशी घोषणा दिली होती. आमच्या समोर कुस्तीसाठी पैलवानचं नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभांतून सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं निकालातून समोर आलं. पवारांच्या झंझावातामुळं महायुतीचा वारू जेमतेम १८० पर्यंतच रोखला गेला. राष्ट्रवादी व काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून निकालाचं विश्लेषण करताना निकालाकडं लक्ष वेधत भाजपला टोले लगावले आहेत. ‘महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असा जनादेश जनतेनं दिल्याचं उद्धव यांनी म्हटलं आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव यांनी चिमटा काढला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून घोषित केले होते. मात्र, ‘तेल’ थोडे कमी पडले. मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी ‘गदा’ जिंकली,’ असं उद्धव यांनी म्हटलंय. ‘या निवडणुकीत पुन्हा एकदा पवारांच्या नेतृत्वाचा कस लागला. ते एका जिद्दीनं लढले,’ अशी प्रशंसाही त्यांनी  केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती