भाजपची पहिली यादी जाहीर, चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (13:14 IST)
विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी अखेर जाहीर केली.
 
या पहिल्या यादीत 125 मतदारसंघांसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, कसबा पेठेतून मुक्ता टिळक, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून परतल्यानंतर ही घोषणा होणार होती, मात्र ते मायदेशी परतल्यानंतरही भाजपच्या उमेदवार यादीचा सस्पेन्स कायम होता. भाजप-शिवसेनेने युतीची घोषणा पत्रकाद्वारे केली. मंगळवारी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
 
विधानसभेसाठी युती करत असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेतर्फे एका संयुक्त पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र त्यात जागावाटपाचे तपशील देण्यात आले नव्हते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेला 124 जागा देण्यात आलेल्या आहेत.
 
जेव्हाही दोन मोठे पक्ष एकत्र येतात तेव्हा ते याबाबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा करतात. पण यावेळी शिवसेना-भाजपने युती तर केली पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. यावरून शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव आहे का, असा प्रश्न विचारला जात होता.
 
भारतीय जनता पक्षाच्या यादीबाबत प्रचंड उत्सुकता होती. शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली असून त्यातूनच त्यांचे उमेदवार जाहीर होत आहेत. जवळपास 80 हून अधिक उमेदवारांना शिवसेनेकडून एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी जागावाटप मात्र अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या यादीबाबत उत्सुकता आहे.
 
भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून मोठ्या संख्येनं नेते पक्षांतर करून आलेले आहेत. यापैकी किती नेत्यांना उमेदवारी मिळणार, कोणकोणत्या मतदारसंघात भाजपकडून नव्यानं आलेल्या उमेदवारी मिळणार आणि कोणकोणत्या मतदारसंघात पक्षातील जुन्या नेत्यांना उमेदवारी मिळणार याचीही उत्सुकता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती