माढा लोकसभा : भाजपकडून निंबाळकर; पण मोहिते पाटलांच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष

सोमवार, 18 मार्च 2024 (20:08 IST)
गणेश पोळ
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलीय.
 
पण त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप आणि महायुती यांच्यातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. 2008मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली. तेव्हा शरद पवार इथून निवडून आले होते.
 
सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर एकेकाळी शरद पवार यांचा दबदबा होता.
 
इतर मतदारसंघाप्रमाणेच याठिकाणी टोकाचं गटातटाचं राजकारण होत असतं.
 
2014मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादी काँ ग्रेस पक्षाचे तत्कालिन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून निवडून आले होते.
 
पण 2019च्या निवडणूक प्रचाराच्यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी पण भाजपची वाट धरली.
 
या राजकीय बदलांमुळे पवारांचा हा गड भाजपकडे सरकला आणि माढ्यात भाजपची ताकद वाढली, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
 
त्यासोबत 2019मध्ये भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे याठिकाणी निवडून आले.
 
निंबाळकर यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
 
पवारांचे माढ्यातील वर्चस्व कमी करण्यासाठीच निंबाळकरांना भाजपने तिकीट दिलं असं सांगितलं जातं.
 
2019मध्ये मोहिते पाटील यांच्या माळशिरसमधून निंबाळकरांना सव्वा लाखाहून अधिक मताधिक्य मिळालं. त्यामुळे निंबाळकर 85 हजार मताधिक्याने निवडून आले होते. तर माळशिरसमधून त्यांना एक लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती.
 
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचा पराभव झाला होता.
 
पण गेल्या पाच वर्षांतील निंबाळकरांच्या कामकाजाविषयी मतदारासंघात नाराजीचा सूर आहे.
 
‘माढ्याचे खासदार माढ्यात फिरतच नाहीत,’ अशी विरोधक टीका करू लागले.
 
तसंच निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना डावलून काही विकास योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला.
 
निंबाळकर यांनी आपल्या विरोधकांशी जवळीक वाढवली आहे. त्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत, अशा बातम्या स्थानिक मीडियात येत असतात.
 
दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती.
 
मतदारसंघ दोनदा पिंजून काढला होता. यावेळी भाजपने आपल्याला तिकीट द्यावं, अशी विनंती केल्याचंही धैर्यशील यांनी म्हटलं होतं.
 
तरीही भाजपच्या दुसऱ्या यादीत रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिल्याने अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर गेल्या काही दिवसांपासून नेत्यांची लगबग सुरू आहे.
 
रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढाई होऊ शकते.
 
तसंच मोहिते पाटील यांनी मागच्यावेळी निंबाळकरांना सव्वालाखाहून अधिक मते मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
पण त्यांची नाराजी यंदा निंबाळकारांना भोवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
 
2024 च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातील राजकीय समीकरणं काय असतील? सध्या मतदारसंघात काय हालचाली सुरू आहेत? आणि निवडणुकीत कोणता फॅक्टर निर्णायक ठरू शकतो? याचा घेतलेला हा आढावा.
 
2019च्या निवडणुकीत नेमकं घडलं?
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ‘माढा आणि शरद पवारांना पाडा’ अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती. दुसरीकडे मोहिते पाटलांनी पण शरद पवार यांची साथ सोडून नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलं होतं.
 
"शरद पवार यांना राजकीय वातावरण कुणाच्या बाजूने फिरतयं हे लगेच कळतं. म्हणून त्यांनी माढ्यातून पुन्हा लढणार नसल्याचं ठरवलं. पण प्रत्यक्षात पार्थ पवारांच्या उमेदवारीचं कारण देत त्यांनी एकाच घरात किती उमेदवारी देणार? हे कारण देत आपण राज्यसभेवर प्रतिनिधित्व करू, असं त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं," असं लोकसत्ताचे सोलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसैन मुजावर यांनी सांगितलं.
 
दुसरीकडे 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीचा धसका घेऊनच शरद पवार यांनी माढातून माघार घेतल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
 
तेव्हा भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत झाली होती.
 
याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे, बसपकडून आप्पा लोकरे हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
 
तेव्हा रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस, माण, फलटण आणि सांगोल्यातून संजय शिंदेंपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं.
 
पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतनाही माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात खोत यांनी कडवी झुंज दिली होती.
 
माढ्याची राजकीय गणिते
लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2008 साली माढा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूरमधील चार आणि साताऱ्यातील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
 
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. साताऱ्यातील माण आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय मंगळवेढा तालुक्यातील 42 गावेही माढा लोकसभा मतदारसंघाला जोडली आहेत.
 
माढा मतदारसंघ काही वर्षांपूर्वीच निर्माण झाल्याने तो नवखा समजला जातो. इथे जुनी प्रस्थापित राजकीय गणितांचा अजून विस्तार झालेला नाहीये. पण इथे गटातटाचं आणि जातीय समीकरणांचं राजकारण स्पष्ट दिसतं, असं मुजावर सांगतात.
 
सध्या या लोकसभा मतदार संघातील विधानसभा आमदारांचा विचार केला तर कागदावर तरी महायुतीचं पारडं जड दिसत आहे.
 
माढा - आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवार गट म्हणजे महायुतीचे आहेत.
 
करमाळा - संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांचा कल अजित पवारांच्या बाजूने असल्याचं म्हटलं जातं. तसंच करमाळ्यातील रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर नारायण बापू पाटील हेही शिंदेंच्या शिवसेना गटाचे नेते आहेत.
 
माण - याठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत.
 
फलटण - इथे अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. तर रामराजे निंबाळकर हे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे कट्टर विरोधक मानले जातात.
 
माळशिरस - राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी उत्तमराव जानकरांचा पराभव केला होता. ते अभाविपचे कार्यकर्ते होते आणि ते मोहिते पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
सांगोला : या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत.
 
मुजावर यांच्यामते, सध्या माढा, करमाळा, माण आणि सांगोल्यातून मोहिते पाटील विरोधी गट एकवटला आहे.
 
इथली जातीय समिकरणे पाहायची म्हटलं तर, याठिकाणी धनगर समाजाचा मतदावर वर्ग तुलनेने जास्त आहे. त्यानंतर मराठा आणि ओबीसी मतदारांचा क्रमांक लागतो.
 
माढा मतदारसंघाच्या नेमक्या समस्या
या मतदारसंघात दुष्काळाचा प्रश्न कायम गंभीर राहिला आहे.
 
माण-खटाव, सांगोला आणि मंगळवेढ्यातील काही गावे या मतदारसंघात येतात. हा पर्जन्यछायेचा प्रदेश मानला जातो. तिथे काही सिंचन योजना अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.
 
या ठिकाणची पाणी टंचाई संपवण्यासाठी मोहिते पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा लावून धरला होता. याच प्रश्नासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय, असा दावा मोहिते पाटील यांनी 2019मध्ये केला होता.
 
2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं होतं. ही योजना लवकरच मार्गी लागणार असल्याने शेतकरी वर्ग भाजपाकडे आकर्षित होताना पहायला मिळाला होता.
 
अनेकदा या भागातील सिंचन योजनेसाठीच्या निविदा निघतात. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही किंवा निधी अपुरा पडल्याच्या तक्रारी येत असतात.
 
गटातटाच्या राजकारणामुळे इथल्या विकास कामांना खीळ बसते, असं राजकीय नेते एकमेकांवर आरोप करताना दिसतात.
 
दुसरीकडे उजनी धरणाचा बांध माढा तालुक्यात येत असला तरी या धरणामुळे करमाळा आणि माढा तालुक्यातील काही ठराविक गावांनाच धरणाच्या पाण्याचा फायदा झाला आहे.
 
याशिवाय या मतदारसंघातील रस्ते आणि रेल्वे हेही मुद्दे काय चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी लोणंद ते पंढरपूर या रेल्वे मार्गाचं भूमीपूजन झालं. पण त्याच्या श्रेयावरून निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात वादही झाला होता.
 
याशिवाय मतदारसंघात औद्योगिक वसाहती, रोजगार, शिक्षण, आरोग्य हे मुद्देही चर्चेत असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती