साताऱ्यात आघाडीचा उमेदवार ठरेना

गुरूवार, 7 मार्च 2024 (08:55 IST)
पक्षांच्या बैठकावर बैठका होत असून अजूनही अनेक मतदारसंघाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे जागा वाटपाचा पेच कायम आहे. अशातच सातारा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीच लढणार असलीतरी शरद पवार गटाचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पुन्हा सातारा, माढ्यावर दावा केल्याने राजकीय तिढा वाढला आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि माढा हे लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ नेहमीच चर्चेत येतात. यावेळीही पेच निर्माण झालेला आहे. याला कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील फाटाफूट. या पार्श्वभूमीवरच आताची निवडणूक होत आहे. सातारा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जाणार आहे. पण, या गटाचा उमेदवार ठरता ठरेना. त्यातच बुधवारी विशेष हेलिकॉप्टरने खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजितसिंह पाटणकर मुंबईला गेले. तेथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. पण, चाचपणी आणि चर्चे व्यतीरिक्त काहीच झाले नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार कधी ठरणार हे स्पष्ट नाही. मात्र, साताऱ्यात महाविकास आघाडीची बैठक झाली. त्याला ३८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातून आघाडीने एकसंधपणा राखत वज्रमूठ तरी आवळल्याचे स्पष्ट झाले आहे.
साताऱ्याची लढत उमेदवार कोण यावर ठरणार ?
 
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून अजुनही कोणताही उमेदवार स्पष्ट नाही. खासदार श्रीनिवास पाटील हेच सध्यातरी प्रबळ ठरु शकतात. पण, त्यांचे वयोमान पाहता पक्षाला दुसरा उमेदवार शोधावा लागेल. पण, तो ताकदीचा असावा लागणार आहे. तरच निवडणुकीत टीकाव धरता येईल. तर सातारा युतीत अजित पवार गटाकडे गेल्यास त्यांच्यापुढे अनेक पर्याय असलेतरी शरद पवार गटाचा उमेदवार कोण यावरच दादा गटाच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर युतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने साताऱ्यावर दावा केला होता. पण, सध्यातरी या गटाकडून काहीच हालचाल नाही.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती