राहुलच्या तडाख्यात आरसीबीचा विराट पराभव : पंजाबचा 97 धावांनी विजय

शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (09:27 IST)
किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसर्या1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्‌ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने बंगळुरूविरुद्ध 20 षटकात 206 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 17 षटकात 109 धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल 97 धावांनी मोठा विजय मिळाला. 69 चेंडूत नाबाद 132 धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला.
 
नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण पंजाबचा कर्णधार राहुलने तो निर्णय चुकीचा ठरवून दाखवला. मयंक अग्रवाल आणि राहुलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. अग्रवाल 20 चेंडूत 26 धावा काढून बाद झाला. निकोलस पूरनदेखील मोठा फटका खेळताना 17 धावा करून माघारी परतला. तर ग्लेन मॅक्सवेलने 5 धावा केल्या आणि तो बाद झाला. पण कर्णधार राहुल मात्र एका बाजूने खेळत राहिला. येणार्याल प्रत्येक गोलंदाजाला अस्मान दाखवण्याचा विडा उचलल्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली. कोहलीने तब्बल दोनदा त्याचा झेल सोडला. त्याचा फायदा घेत राहुलने यंदाच्या आयपीएलमधील पहिले तुफानी शतक ठोकले. त्याने 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. त्यात 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
 
आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ 109 धावांवरच गारद झाला. सलामीला आलेला देवदत्त पडिक्कल एका धावेवर माघारी परतला. पाठोपाठ जोशुआ फिलीप (0), कोहली (1) हे दोघेही लगेच बाद झाले. त्यामुळे बंगळुरूची अवस्था 3 बाद 4 धावा अशी झाली होती. त्यानंतर फिंच आणि डी'व्हिलियर्स जोडीने काही काळ खेळपट्टी सांभाळली, पण फिंच 20 धावांवर तर डी'व्हिलियर्स 28 धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली पण त्यालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. अखेर 17व्या षटकातच बंगळुरूचा संघ 109 धावांत गारद झाला. रवी बिष्णोई आणि मुरूगन अश्विन या फिरकी जोडगोळीने 3-3 बळी टिपले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती