भारतीय संघाचा भविष्यातील सुपरस्टार आहे पंत – युवराज सिंग

गुरूवार, 28 मार्च 2019 (07:12 IST)
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान झालेल्या सामन्यात दिल्लीच्या संघातील धडाकेबाज ऋषभ पंतने धमाकेदार फटकेबाजी करत मुंबईच्या संघातील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडताना केवळ 27 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 78 धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. यावेळी ऋषभच्या बाबतीत बोलताना मुंबईच्या युवराज सिंगने सांगितले की, ऋषभ पंत हा भारतीय संघाचा भविष्यातील मोठा स्टार असणार आहे.
 
यावेळी पुढे बोलताना युवराज म्हणाला की, विश्‍वचषकासाठी भारतीय संघामध्ये त्याची निवड होईल की नाही याबद्दल मी आताच काही बोलणार नाही. पण त्याने केलेली वादळी खेळी ही अप्रतिम आणि अविश्‍वसनीय होती. तसेच कसोटी संघातही त्याने आपली छाप पाडली आहे. विदेशात दोन शतके झळकावणे आणि तेदेखील केवळ 21 वर्षांचा असताना ही बाब खरंच कौतुकास्पद आहे.
 
यावरूनच तो उत्तम पद्धतीचा खेळ करणारा खेळाडू आहे, याची कल्पना येते. त्याला आता योग्य संधी देण्यात आल्या पाहिजेत. कारण तो भारतीय क्रिकेटमधील भविष्यातील महान खेळाडू ठरणार आहे, हा मला विश्‍वास आहे. दरम्यान पहिल्या सामन्यात मुंबईचे शिलेदार गारद होत असताना युवराज सिंगने दुसऱ्या बाजूने लढा देत 35 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावांची उपयुक्त खेळी साकारली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती