श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

सुमारे १८९३ चा काळ... तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर तेथे त्यांची रहावयाची इमारत होती. 
 
त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यान त्यांच्या गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन करत त्यांना धीर देत सांगितले की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि ही दोन्ही दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. 
 
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे. 
 
सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. नंतर शेटजींचे निधन झाल्यावरही गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्यात आली.
 
सन १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांना पाचारण केले गेले. ही मूर्ती तयार करत असताना सूर्यग्रहण आले असून त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले. यामुळे मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढेल आणि मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती.
 
 
१९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली. 
 
सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दांपत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. बैठ्या मूर्तीचे चारही हात सुटे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे, तर उजवा हात वरद म्हणजे आशीर्वाद देणारा आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुगूट आहे. मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम हाही उत्कृष्ट कलाकारीचा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहात आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकांना येते. हा गणपती लोकमान्य टिळक यांचा काळात बसवला गेला. त्याकाळी ही मूर्ती बनविण्याचा खर्च सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रुपये) इतका आला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती