WHO : पुढचे 2 आठवडे धोक्याचे! रोज 1 लाखांहून अधिक रुग्ण वाढणार

मंगळवार, 16 जून 2020 (12:03 IST)
जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर इशारा दिला आहे. आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचं थैमान कायम राहणार असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
 
मागच्या काही दिवसांमध्ये वेगानं रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. 15 दिवसांमध्ये जवळपास रोज 1 लाखहून अधिक नवीन रुग्णांना लागण झाल्याचं समोर येत आहे. पुढचे दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहिल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)दिला आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांच्या म्हणण्यानुसार 50 दिवसांनंतर पुन्हा एकदा चीनमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये 90 हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीन सध्या हे प्रकरण सध्या चांगल्या पद्धतीनं हाताळलं जाईल असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे. चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक तिथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
 
आफ्रिकेमध्येही कोरोनाचा संसर्ग (coronavirus)वेगानं पसरत असल्याचंही सांगितलं आहे. येत्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. 
 
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात आहे. आजही 10 हजार 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 380 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 3 लाख 43 हजार 91वर पोहचला आहे. 
 
मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या 1 लाख 53 हजार 178 सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 013 रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या 9 हजार 900 आहे. दुसरीकडे अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारताचा सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती