“मामी-2019’चे एक्‍सलन्स ऍवॉर्ड अभिनेत्री दिप्ती नवल यांना

शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (15:31 IST)
53 देशांतील 49 भाषांमधल्या 190 चित्रपटांची पर्वणी
मुंबई- वर्ष 1979 मध्ये “एक बार फिर’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या व त्यानंतर 60 चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना मामि मुंबई चित्रपट महोत्सव-2019 दरम्यान “एक्‍सलन्स इन सिनेमा’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अभिनयाखेरीज दिग्दर्शन, चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणूनही आपला ठसा उमटवलेल्या दीप्ती नवल या चित्रपटांमध्ये संवेदनशील भूमिका साकारण्याबाबत ओळखल्या जातात, तसेच भारतीय महिलांची बदलती ओळखही नवल यांनी अनेक चित्रपटांतून साकारली आहे.
 
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या मुंबई ऍकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस अर्थात मामि चित्रपट महोत्सवाला येत्या 14 ऑक्‍टोबर रोजी प्रारंभ होणार आहे. जियो मामि मुंबई फिल्म फेस्टिव्हल विथ स्टारचे हे यंदा 21 वे वर्ष असेल. मामि बोर्डाचे विश्‍वस्त झोया अख्तर, विशाल भारद्वाज, सिद्धार्थ रॉय कपूर, रोहन सिप्पी, अजय बिजली; तसेच महोत्सवाच्या संचालिका अनुपमा चोप्रा व कला दिग्दर्शक स्मृती किरण यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
 
भारतीय चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा एक हक्काचा आणि खात्रीलायक महोत्सव, अशी या महोत्सवाची ओळख गेल्या काही वर्षांत बनली आहे. स्वतंत्र व व्यावसायिक या धाटणीच्या चित्रपटांना एकाच वेळी प्रदर्शित करताना जगभरातील चोखंदळ रसिकांचे भारतातील विविधांगी चित्रपटांबाबत प्रबोधन करण्यात मामि मुंबई चित्रपट महोत्सवाने मोलाची भूमिका बजावली आहे.
 
या महोत्सवात प्रदर्शित 190 चित्रपटांपैकी 50 चित्रपटांचा पदार्पणाचा खेळ असेल; तर 13 चित्रपटांचा जागतिक प्रीमियर असेल. देशांतील भाषांमधील चित्रपट मामि मुंबई चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होतील, असे संयोजकांमार्फत कळवण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती