ऋषी कपूर : राज कपूर यांच्या अफेअर्सपासून रणबीरसोबतच्या नात्यापर्यंत ‘खुल्लम खुल्ला’ खुलासे

शुक्रवार, 1 मे 2020 (17:29 IST)
पंकज प्रियदर्शी
हिंदी सिनेसृष्टीत पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यानंतर कपूर खानदानातली स्टारडम उपभोगणारी तिसरी व्यक्ती म्हणजे ऋषी कपूर.
 
ऋषी कपूर यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या स्वभावातला बिन्धास्तपणाही लोकांना आवडायचा. आपण खूप मद्यपान करायचो, ही गोष्ट त्यांनी कधीच लपवली नाही. मुलगा रणबीर कपूर याच्यासोबत 'जनरेशन गॅप' असल्याचंही ते मान्य करायचे.
 
आपली मतं ठामपणे मांडण्याच्या स्वभावामुळे सोशल मीडियावर त्यांना बरेचदा ट्रोलही केलं जायचं. बरेचदा रात्री उशिरा ते विनोदी ट्वीट करायचे, तर काही वेळा त्यांचे ट्वीट त्यांच्या अडचणी वाढवायचे.
 
2017 साली त्यांचं 'खुल्लम खुल्ला' हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. नावाप्रमाणेच या पुस्तकात त्यांनी बऱ्याच गोष्टी उघडपणे सांगितल्या, स्वीकारल्या, कबलू केल्या.
 
ऋषी कपूर यांच्याविषयीच्या काही गोष्टींची दबक्या आवाजात चर्चा व्हायची. मात्र, कपूर खानदानातल्या कुणीच त्याची उघडपणे कबुली दिली नव्हती. या गोष्टी त्यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत.
 
राज कपूर यांचे विवाहबाह्य संबंध
आपल्या पुस्तकात ऋषी कपूर यांनी एका अतिशय खाजगी गोष्टीची जाहीर कबुली दिली होती. त्यांचे वडील 'लिजेंडरी' राज कपूर विवाहित असूनही त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध होते.
 
आपल्या आत्मचरित्रात त्यांनी राज कपूर यांच्या अभिनेत्री नर्गीस आणि वैजयंती माला यांच्यासोबत असलेल्या संबंधांविषयी चर्चा केली आहे.
 
ऋषी कपूर यांनी सांगितलं की, त्या काळात ते आणि त्यांच्या आई आधी एका हॉटेलमध्ये आणि त्यानंतर 'चित्रकूट'मधल्या एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते.
 
ऋषी कपूर सांगतात की, त्यांच्या आई मागे हटल्या नाही. राज कपूर जेव्हा त्या प्रकरणांमधून बाहेर पडले तेव्हाच त्यांच्या आई घरी परतल्या. त्यावेळी ऋषी कपूर खूप लहान होते.
 
पण वडील राज कपूर आई कृष्णा कपूर यांची मनधरणी करण्याचा कसा प्रयत्न करायचे, हे त्यांना चांगलंच आठवतं होतं.
 
नीतू सिंह यांच्या आधीही एक प्रेमप्रकरण
ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचं लग्न बॉलीवुडमध्ये बरंच गाजलं. मात्र, नीतू यांच्या प्रेमात पडण्याआधी आपण एका पारशी मुलीच्या प्रेमात होतो, असं त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे.
 
त्या मुलीचं नाव यास्मीन मेहता होतं. हा किस्सा त्यांचा पहिला सिनेमा 'बॉबी' प्रदर्शित होण्याआधीचा आहे. 'बॉबी' चित्रपट रीलिज झाल्यानंतर अनेक फिल्मी मॅगझिन्सने ऋषी आणि डिंपल कपाडिया यांच्यात संबंध असल्याच्या बातम्या छापल्या होत्या.
 
त्याकाळचं प्रसिद्ध मासिक स्टारडस्टनेही यावर स्टोरी केली होती. मात्र, त्यावेळी डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांचं लग्न झालं होतं.
 
या गॉसिपमुळेच यास्मीनबरोबरच्या नात्यावर परिणाम झाल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. पुस्तकात ऋषी कपूर लिहितात की, त्यांनी यास्मीनला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.
 
राजेश खन्ना ऋषी यांच्यावर का झाले होते नाराज?
यास्मीन मेहता आणि डिंपल कपाडिया यांच्याशी संबंधित आणखी एक आठवण त्यांनी पुस्तकात सांगितली आहे. ते यास्मीन मेहताला डेट करत होते तेव्हा तिने त्यांना एक रिंग गिफ्ट केली होती.
 
बॉबीच्या शूटिंग दरम्यान डिंपल कपाडियाने ती रिंग आपल्या बोटात घातली आणि ठेवून घेतली.
 
जेव्हा राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडियाला प्रपोज केलं तेव्हा त्यांना डिंपल यांच्या बोटात ती रिंग दिसली. त्यांनी ती रिंग काढून जुहूच्या आपल्या बंगल्याजवळच्या समुद्रात फेकून दिली.
 
पुढे ऋषी कपूर यांनी हेदेखील लिहिलं आहे की, त्यांना डिंपल कपाडियांबद्दल कधीच आकर्षण वाटलं नव्हतं आणि ते कधीच त्यांच्या प्रेमात नव्हते.
 
अमिताभ यांनी सहकलाकारांना श्रेय दिलं नाही
 
अमिताभ बच्चन यांच्यासोबत कपूर घराण्याचं नातं आहे. आणखी एक नातं जुळून येत असतानाच ते तुटलं. मात्र, ऋषी कपूर यांनी पुस्तकात अमिताभ बच्चन यांच्याविषयी आपलं मत उघडपणे मांडलं होतं.
 
त्यांनी लिहिलं होतं की, मल्टी स्टारर अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणं सेकंड लीड अॅक्टरसाठी कठीण असायचं. त्याकाळी अॅक्शन चित्रपट मल्टीस्टारर असायचे. त्यात अनेक अभिनेते काम करायचे.
 
चित्रपट हिट झाल्यावर लीड स्टार सर्व क्रेडिट घेऊन जायचा. हे केवळ आपल्यासोबत घडल नसल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलं होतं. शशी कपूर, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांनाही या अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे.
 
ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं, "आम्ही छोटे स्टार होतो. मात्र, कलाकार म्हणून कमी नव्हतो. अमिताभ बच्चन यांनी मात्र कधीच हे स्वीकारलं नाही. कुठल्याच मुलाखतीत नाही आणि कुठल्याच पुस्तकातही नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना त्यांचं श्रेय दिलं नाही."
जेव्हा नीतू सिंहवर निघाला सगळा संताप
ऋषी कपूर यांनी स्टारडम अऩुभवलं तसंच वाईट काळही बघितला. बॉबी सुपरडुपर हिट झाला आणि ऋषी कपूर पहिल्याच सिनेमानंतर स्टार झाले. त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या.
 
त्यांच्या सिनेमांकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. तोपर्यंत नीतू सिंह आणि त्यांचं लग्न झालं होतं.
 
ऋषी कपूर सांगतात, की तो काळ त्यांच्यासाठी निराश करणारा होता. याच निराशेच्या गर्तेत त्यांनी आपल्या अपयशाचं खापर नीतू सिंह यांच्यावर फोडायला सुरुवात केली.
 
त्यावेळी नीतू सिंह प्रेग्नंट होत्या. मात्र, तरीही त्यांना ऋषी कपूर यांच्याकडून अवहेलना सहन करावी लागली. कुटुंबीय आणि मित्रांमुळेच आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडल्याचं ऋषी कपूर यांनी पुस्तकात लिहिलं आहे.
 
मात्र, त्यावेळी नीतू सिंह यांना काय वाटलं असेल, याची आपल्याला पुरेपूर कल्पना असल्याचं ते म्हणतात.
 
जेव्हा फिल्मफेअर विकत घेतला होता...
ऋषी कपूर यांनी त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी लिहिताना हेदेखील सांगितलं होतं की, कदाचित 'बॉबी' सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर पुरस्कार मिळाल्याने अमिताभ बच्चन त्यांच्यावर चिडले होते.
 
ऋषी कपूर यांच्या मते कदाचित अमिताभ बच्चन यांना 'जंजीर' चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळेल, अशी आशा होती. मात्र, तो पुरस्कार ऋषी कपूर यांना मिळाला.
 
ऋषी कपूर यांनी लिहिलं होतं- मला हे सांगताना वाईट वाटतंय की, तो पुरस्कार मी विकत घेतला होता. सर, तुम्ही 30 हजार रुपये द्या. मी हा पुरस्कार तुम्हाला मिळवून देतो, असं एका पीआरनं त्यांना सांगितलं होतं.
 
कुठलाही विचार न करता आपण त्याला पैसे दिल्याचं ऋषी कपूर यांनी पुस्तकात म्हटलंय.
 
जावेद अख्तर यांना टोमणा
ऋषी कपूर यांना कधीच सलीम-जावेद या जोडीचं लिखाण फार रुचलं नव्हतं. पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की, ईमान धरम' चित्रपट आदळल्यानंतर ऋषी आणि त्यांचे मित्र जावेद अख्तर यांना चिडवण्यासाठी त्यांच्या अपार्टमेंटपर्यंत गेले होते.
 
मग जावेद अख्तर यांनीही आपला पुढचा प्रोजेक्ट 'बॉबी'पेक्षाही मोठा हिट होईल, असं म्हटलं होतं.
 
खरंतर नंतर ऋषी कपूर यांनी सलीम-जावेद या जोडीसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, यातला कुठलाच सिनेमा लक्षात राहण्याजोगा नव्हता.
 
ऋषी कपूर यांनी पुस्तकात आणखी एक गोष्ट सांगितली होती. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत गीतकार शैलेंद्र यांच्या अकाली जाण्यासाठी राज कपूर जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यासाठी आपण जावेद अख्तर यांना कधीच माफ करणार नाही, असं ऋषी कपूर यांनी म्हटलं होतं.
 
रणबीर कपूरसोबत नातं
ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात हे स्पष्टपणे लिहिलं आहे, की रणबीर कपूर त्यांच्याशी कधीच फार मोकळेपणाने वागला नाही. रणबीर आईशीच जास्त बोलायचा.
 
रणबीर कपूरने कारकिर्दीच्या सुरुवातीला जे चित्रपट केले त्यावर आक्षेप असला तरी आपण कधीही रणबीरच्या करिअरमध्ये ढवळाढवळ केली नसल्याचं ते म्हणतात.
 
रणबीरशी असलेल्या बाँडिंगविषयी ऋषी कपूर लिहितात - पुढे काय होईल, मला माहिती नाही. माझी मुलं काय करतील, मला माहिती नाही. माझी आणि डब्बूची मुलं भविष्यात आमच्याशी कसं वागतील, हेही मला माहिती नाही. ते आरके बॅनर जिवंत ठेवतील? त्याचा वारसा कसा पुढे नेतील? 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती