मनसे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल, राष्ट्रवादीचेच मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे?

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
साभार ट्विटर 
सध्या राज्यात कोरोना रूग्णांचे आकडे वाढतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यूही लागला आहे.
 
यातच येत्या 1 मार्चपासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री राजेश टोपे, जयंत पाटील, छगन भुजबळ हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
 
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरचं सरकारमधले मंत्री कसे पॉझिटिव्ह येतात हा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. संदिप देशपांडे म्हणतात, "लोकल ट्रेन ही मुंबईत सुरू केली मग आकडे अमरावतीमध्ये कसे वाढले?
 
या आकडेवारीचा सोर्स काय आहे? जर तुम्ही टेस्टींग वाढवलं तर रूग्णांची आकडेवारी वाढणार आहे. हे स्पष्ट आहे.राज्याचा 'रिकव्हरी रेट' हा 95% आहे. तरीही लोकांना का घाबरलं जातय? महाविकास आघाडी सरकारला अधिवेशन चालवायचं नाही. लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. यासाठी हे सर्व नाटक सुरू आहे."
 
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 1 मार्च ते 8 मार्च होणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. 8 मार्चनंतर किती दिवस अधिवेशन घ्यायचं याबाबतचा निर्णय 25 फेब्रुवारीला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे.
 
पण संदीप देशपांडे यांच्या आरोपाबाबत बीबीसी मराठीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना विचारलं असता ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री सर्वाधिक लोकांमध्ये असतात म्हणून ते पॉझिटिव्ह येतात. जे घरी बसलेले असतात त्यांना काही होत नाही ही फरक आहे. अधिवेशनाबाबत बोलायचं झालं तर पहील्या आठवड्यात पुरवणी मागण्या आणि दुसर्‍या आठवड्यात अर्थसंकल्प मांडण्यात येईल. त्यानंतर त्यावर चर्चा होईल. त्यामुळे या अधिवेशनासाठी तीन आठवडे तरी लागणारच आहेत. त्यामुळे मनसेचा हा आरोप बालिश आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती