'कोरोनिलच्या प्रमोशनला आरोग्य मंत्र्यांनी उपस्थित राहणे ही लाजिरवाणी गोष्ट' - IMA

सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (18:29 IST)
योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या 'कोरोनिल' औषधावर वाद निर्माण झालाय. पतंजलीने कोव्हिड-19 विरोधात 'कोरोनिल' प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिल्याचा दावा केला.
 
जागतिक आरोग्य संघटनेने बाबा रामदेव आणि पतंजलीचा दावा फेटाळून लावला.
 
दुसरीकडे, 'कोरोनिल'च्या लॉंचला केंद्रीय आरोग्यमंत्री उपस्थित राहिल्याने देशभरातील खासगी डॉक्टर नाराज झालेत. "तुम्ही आरोग्यमंत्री आहात. मग, देशासमोर असे खोटे दावे करणं किती योग्य आहे?", असा सवाल डॉक्टरांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना विचारला आहे.
 
आरोग्यमंत्र्यांनी या औषधांना प्रमोट करणं म्हणजे, लाज (Shame) आणण्यासारखं, अशी प्रतिक्रिया खासगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे.
 
WHO ने फेटाळला दावा
बाबा रामदेव आणि पतंजलीने दावा केल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या ट्विटरवरून सांगण्यात आलं,
 
"जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरोधातील कोणत्याही पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या औषधाला तपासलेलं नाही किंवा मान्यता दिलेली नाही"
 
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे वाद
पतांजलीच्या 'कोरोनिल' औषधाचं लॉंच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत झालं. त्यामुळे अलोपॅथी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) याला विरोध दर्शवला आहे.
 
"जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या सर्टिफिकीटबाबत धादांत खोटं ऐकून धक्का बसला," अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी दिली.
 
"केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे", असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे मानद महासचिव डॉ. जयेश लेले यांनी म्हटलं.
 
'कोरोनिल'चा वापर कोरोना प्रतिबंध आणि उपचारांसाठी केला जाऊ शकतो, असा दावा पतंजलीने केला. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना प्रश्न विचारलेत.
 
IMA चे आरोग्यमंत्र्यांना 7 प्रश्न
1. तुम्ही आरोग्यमंत्री आहात. मग, देशासमोर असे खोटे दावे करणं किती योग्य आहे?
 
2. आरोग्यमंत्री असताना, चुकीची आणि अशास्त्रीय दावे असलेली गोष्ट लोकांसमोर कशी लॉंच करू शकता?
 
3. स्वत: अलोपॅथी डॉक्टर असूनही जनसामान्यांसमोर कोणत्याही शास्त्राचा आधार नसलेली गोष्ट प्रमोट कशी करू शकता?
 
4. तुम्ही कोरोनाविरोधी ज्या औषधाची जाहिरात केलीत. त्याची चाचणी कधी झाली? केव्हा करण्यात आली? याची माहिती द्या
 
5. या औषधाची चाचणी कशा प्रकारे करण्यात आली?
 
6. या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी किती स्वयंसेवक होते? चाचणी कुठे करण्यात आली?
 
7. बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात मॉडर्न मेडिसीनबाबत अक्षेपार्ह उद्गार काढले. याबाबत तुम्ही काय बोलणार?
 
IMA ची भूमिका
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भूमिकेबाबत बोलताना IMA चे अध्यक्ष डॉ. जे.ए.जयालाल म्हणतात, "कोरोनिल कोरोनाविरोधात प्रभावी असेल तर, सरकार कोरोना लसीकरणासाठी 35000 कोटी रूपयांचा खर्च का करत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणापेक्षा कोरोनिल चांगलं आहे, असं आरोग्यमंत्र्यांना सुचवायचं आहे का?"
 
तर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणतात, "जनतेच्या आरोग्याशी असा खेळ अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याबाबत तातडीने खुलासा केला पाहिजे."
 
काय म्हणाले होते केंद्रीय आरोग्यमंत्री
बाबा रामदेव यांच्या कोरोनिल औषधाच्या लॉंच प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले होते, "आयुर्वेदाची उपयोग्यता आणि प्रामाणिकता आहे. भविष्यात लोकांना निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदाची मदत नक्की होईल. याबाबत कोणालाही शंका असण्याचं कारण नाही."
 
मात्र, IMA चे डॉक्टर म्हणतात, भेसळ नसलेल्या आयुर्वेदावर आमचा विश्वास आहे. मात्र, भेसळ असलेल्या आयुर्वेदावर नाही.
 
या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, "आयुर्वेदाला जागतिक आरोग्य संघटनेही मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कोलंबिया, क्यूबा, मॉरिशस यांसारख्या देशांनी आयुर्वेदाला त्यांच्या रेग्युरल सिस्टिम ऑफ मेडिसीनमध्ये स्थान दिलं आहे."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती