भास्कर जाधव : 2004 मध्ये मातोश्रीवर ताटकळत ठेवल्यानंतर सोडली होती शिवसेना

शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019 (15:44 IST)
ज्या मातोश्रीवर 2004 मध्ये ताटकळत ठेवल्यानंतर अत्यंत भावनाविवश होऊन भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली. त्याच मातोश्रीवर आज 15 वर्षांनंतर भास्कर जाधव पुन्हा एकदा शिवसेनेत दाखल झाले आहेत.
 
भास्कर जाधव यांनी हातातल्या घड्याळ्याला जय महाराष्ट्र करत पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले आहे.
 
शुक्रवारी सकाळी भास्कर जाधव यांनी औरंगाबादमध्ये जाऊन आपला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवला. ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार होते. राष्ट्रवादी सोडून त्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
1982 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेमधून यांच्या राजकारणाला सुरुवात केली. 1992 मध्ये ते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1995 आणि 1999 असे दोन वेळा ते चिपळूणमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले.
2004 मध्ये मात्र त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे 2004 मध्ये त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात त्यांना विविध खात्याची मंत्रिपदं सांभाळली. राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी काही काळ सांभाळलं.
 
कशी सोडली होती जाधवांनी शिवसेना?
भास्कर जाधवांनी 2004 मध्ये शिवसेना सोडताना काय परिस्थिती होती यावर kolaj.in चे संपादक सचिन परब सांगतात,
 
"2004 मध्ये शिवसेनेकडून एक सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्व्हेतून भास्कर जाधव पराभूत होतील असं शिवसेनेला सांगण्यात आलं होतं आणि त्याआधारे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मातोश्रीवर भास्कर जाधवांना त्यावेळी ताटकळत ठेवलं गेलं. त्यामुळे ते भावनाविवश झाले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्यावर तोफ डागत शिवसेना सोडली होती. शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर शिवसेना सोडणारे ते पहिले महत्त्वाचे नेते होते. त्यांच्यानंतर नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली."
 
परब पुढे सांगतात की "2004 मध्ये कोकणामध्ये शिवसेनेत नारायण राणेंनंतरचे महत्त्वाचे नेते भास्कर जाधव होते. जाधवांकडे संघटन कौशल्य होतं, प्रभावशाली वक्तृत्व होतं, ते जमिनीशी जोडलेले होते, कोकणातील महत्त्वाचा समुदाय असलेल्या मराठा समाजातून ते होते. त्यामुळे नारायण राणेंसाठी ते आव्हान ठरू शकले असते. त्यामुळेच संभाव्य स्पर्धेमुळे त्यांना 2004 मध्ये उमेदवारी नाकारली गेली असावी अशीही एक शक्यता आहे. 2004 मध्ये नारायण राणेंचं शिवसेनेत बऱ्यापैकी वर्चस्वही होतं."
 
बहुतेक नेते भाजपमध्ये जात असताना भास्कर जाधव यांनी शिवसेना का निवडली, यावर सचिन परब यांचं म्हणणं आहे, की बरेच प्रयत्न करूनही पनवेलच्या पुढे कोकणात भाजपचं संघटन गेलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कट्टर विरोधक नारायण राणे भाजपमध्ये गेल्यामुळेही जाधव शिवसेनेत जाणं साहजिक होतं.
राष्ट्रवादी काँग्रेस का सोडली?
लोकसत्ताचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी सतीश कामत भास्कर जाधवांच्या राजकारणाबद्दल सांगतात की, "दोन तुल्यबळ नेत्यांचं जसं जमू शकत नाही तीच अडचण भास्कर जाधव यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना मित्रांपेक्षा शत्रूच अधिक होते. शेजारच्या रायगडमधील सुनील तटकरे, रत्नागिरीतील रमेश कदम, शेखर निकम यांच्याशी त्यांचं जमलं नाही. उदय सामंत राष्ट्रवादीत होते तोपर्यंत त्यांचं आणि जाधवांचं जमलं नाही. भास्कर जाधव विरूद्ध उरलेले नेते असं चित्र राष्ट्रवादीत होतं. या त्यांच्या स्वभावाला मुरड घालून ते कसं शिवसेनेत स्वत:ला सामावून घेतात ते पाहायला हवं. तिथेही पुन्हा त्यांचे प्रतिस्पर्धी उदय सामंत त्यांच्यासमोर आहेतच."
 
'सकाळ'चे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख शिरीष दामले यांचं म्हणणं आहे की सुनील तटकरे यांच्याशी न जमणे हे भास्कर जाधवांच्या पक्ष सोडण्याचं मुख्य कारण आहे.
 
ते सांगतात "तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात पूर्वीपासूनच सख्य नाही. त्यात तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर भास्कर जाधवांची अस्वस्थता अधिक वाढली. त्यामुळे राष्ट्रवादीत समाधानी नसल्यानं ते पक्षातून बाहरे पडणं साहजिकच होतं."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भास्कर जाधवांवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "सत्तेसाठी ते आले होते, ते सत्तेसाठी आता तिकडे गेले आहेत. आमच्याकडे गुहागरच्या जागेसाठी पर्यायी उमेदवार आहे आणि आम्ही ताकदीने लढवून ती जागा जिंकू. याच भास्कर जाधवांना एनसीपीच्या उमेदवाराने पराभूत केलं होतं आणि त्यानंतर ते आमच्याकडे आले होते. आता तिकडे गेले आहेत तर त्यांना पुन्हा पाडू आम्ही."
 
रत्नागिरीच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
सतीश कामत यांचं म्हणणं आहे की भास्कर जाधव यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचं बळ वाढणार आहे. "गुहागर, चिपळूण आणि दापोली या तीन मतदारसंघांमध्ये भास्कर जाधव यांचा प्रभाव असल्यानं शिवसेनेला याचा फायदा होईल. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकप्रकारे अस्तित्वाची लढाईच आहे. एकेकाळी रत्नागिरीच्या उत्तर भागावर राष्ट्रवादीची पकड होती. खेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम आमदार आहेत. त्यांना जागा टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तर राष्ट्रवादीचे शेखर निकम चिपळूणमधून गेल्या निवडणुकीत थोड्या फरकाने 2014 मध्ये पराभूत झाले होते. पण त्यांना यंदा बरंच झगडावं लागेल."
 
भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव हे सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. सतीश कामत यांचं म्हणणं आहे की आता मुलाचं राजकीय बस्तान बसवणं याला भास्कर जाधवांचं प्राधान्य आहे. मुलाला या निवडणुकीत किंवा पुढच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतील असं कामत यांचं म्हणणं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती