शिक्कामोर्तब: शिवसेना-भाजपची 25 वर्षांची युती अभेद्य!

मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (17:26 IST)
राज्यात शिवसेना आणि भाजपची गेली 25 वर्षांची युती कायम ठेवण्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे अखेर जागावाटपाच्या मानापमानाच्या नाट्यावर अखेर मंगळवारी पडदा पडला. सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेच्या संजय राऊत आणि भाजपच्या विनोद तावडेंनी पत्रकार परिषदेत युती टिकण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेनेने नवा फॉर्म्युला मांडला आहे. यानुसार निवडणुकीत शिवसेना 150, भाजप 124 जागा आणि मित्रपक्षांना 14 जागा दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेने जागावाटपाचा नवा प्रस्ताव ठेवला असून घटकपक्षांसोबत चर्चा करुनच त्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. आज संध्याकाळी घटक पक्षांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा