राही सरनोबत: कोल्हापूरची नेमबाज कशी बनली आंतरराष्ट्रीय खेळाडू?

मंगळवार, 26 जानेवारी 2021 (12:10 IST)
राही सरनोबत - भारताची सर्वोत्कृष्ट पिस्तुल नेमबाज. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा दुखापतीमुळे ती नेमबााजीतून निवृत्त होण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपली होती. मात्र, दुखापतीतून बरी होत तिने दमदार पुनरागमन केलं. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक्स स्पर्धेत ती भारताची मजबूत दावेदार आाहे.
 
महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या राही सरनोबतने 25 मीटर पिस्तुल नेमबाजीच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.
 
2019 साली जर्मनीमधल्या म्युनिच शहरात झालेल्या ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने 25 मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आणि 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये तिचं स्थान निश्चित झालं. नेमबाजी क्रीडा प्रकारात देशाचं नाव उंचावणाऱ्या राहीला 2018 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
 
नेमबाजीची गोडी
राही कोल्हापूरमध्ये शाळेत NCC कॅडेट होती. तिथेच तिची बंदुकीशी ओळख झाली. मी बंदूक चांगली हाताळायचे आणि बंदूक हातात असल्यावर एकप्रकारे सशक्त झाल्याची भावना जाणवायची, असं राही सांगते.
 
मात्र, तिला नेमबाजीत करियर करण्याची खरी प्रेरणा मिळाली ती तेजस्विनी सावंतकडून. तेजस्विनी सावंत राहीच्याच शाळेत होती. 2006 साली ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तेजस्विनीने सुवर्णपदक पटकावलं होतं. सावंतने सुवर्ण पदक पटकावल्याने राहीला या खेळाविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. तिने ताबडतोब तिच्या शहरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठीची चौकशी सुरू केली.
 
अडचणींचा सामना
काही दिवसातच कोल्हापुरात नेमबाजीच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याचं तिच्या लक्षात आलं. सोयी-सुविधांविषयीची ही निराशा मी माझ्या प्रशिक्षकांकडे बोलून दाखवायचे, असं राही सांगते. मात्र, प्रशिक्षकांनी तिला सोयी-सुविधांकडे फार लक्ष न देता खेळ कसा उत्तम होईल, यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.
 
तिच्या पालकांचाही तिला पूर्ण पाठिंबा होता. सुरुवातीला सोयी-सुविधांच्या अभावी येणाऱ्या निराशेमुळे तिचं स्वप्न भंगणार नाही, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. नेमबाजीसाठी लागणाऱ्या उत्तम सुविधा असणाऱ्या मुंबईत ती आली आणि जास्तीत जास्त वेळ मुंबईत घालवू लागली.
 
मात्र, अडचणी काही संपल्या नाही. स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी लागणाऱ्या बंदुका आणि दारुगोळा मागवतानाही तिला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, ती खचली नाही आणि तिची मेहनत फळाला आली. नेमबाजीच्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये ती पदकं पटकावू लागली.
 
लक्ष्यभेद
देशांतर्गत स्पर्धेतल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. 2008 साली पुण्यात झालेल्या युथ कॉमनवेल्थ स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावलं. त्यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही.
 
पुढे ऑलिम्पिक्स गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीप्स अशा वेगवगेळ्या मानाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं.
 
एक खेळाडू म्हणून राहीने अनेक चढ-उतार बघितले. मात्र, प्रत्येक कठीण प्रसंगातून ती तावून-सुलाखून बाहेर पडली. 2015 साली झालेल्या एका दुखापतीने तिच्या खेळावर मोठा परिणम झाला. खेळातून निवृत्ती घ्यायच्या निर्णयापर्यंत ती येऊन ठेपली.
 
मात्र, आपल्या मनोनिग्रहाने तिने त्याही परिस्थितीवर मात केली आणि 2018 साली जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर नाव कोरलं. एशियन गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक पटकवणारी ती भारताची पहिला महिला नेमबाज ठरली. पुढच्या वर्षी तिने ISSF वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक पटकावून 2021 साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये जागा निश्चित केली.
 
नेमबाजीतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 2018 साली तिला भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा सन्मान असणाऱ्या अर्जुन पुरस्कारने गौरवण्यात आलं. अर्जुन पुरस्कार आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं ती सांगते.
 
देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावण्याचं राहीचं स्वप्न आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाची मजबूत दावेदार होण्याची आशा तिला आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती