मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर निवृत्तीबाबत कोणताही दबाव नव्हता, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)कडून स्पष्ट करण्यात आले आहे. सचिनने कोणत्याही दबावात येऊन नव्हे, तर पुढच्या विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना संधी मिळून संघाची तयारी व्हावी, या उद्देशानेच एकदिसवीय क्रिकेटमदून निवृत्ती घेतली असल्याचेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले.
बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी म्हणाले, की 2015मध्ये होणार्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू करावी, असे वक्तव्य सचिनने केले आहे. त्यामुळे त्याने निवृत्तीबाबत पूर्वीचा निर्णय घेतला असावा, असे वाटते. बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले, की पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ निवडण्यापूर्वीच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीचा निर्णय बीसीसीआयला कळविला होता. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. तो एक महान फलंदाज असून, त्याच्या निर्णयाचा क्रिकेटप्रेमीही आदर करतील. त्याने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, असे आपल्याला वाटते.