अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसभाई यांच्यात काय वाद होता?
शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (13:09 IST)
मुंबई आणि परिसरात काही दिवसांच्या अंतरावर दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आणि दोन्ही गोळीबार राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत.काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील उल्हासनगर येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शाखा प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडल्या. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंत पश्चिम मुंबईतील दहिसर परिसरात माझी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर माॅरिस नावाच्या इसमाने गोळ्या झाडल्या.
त्यात त्यांचा मृत्यू झाल आहे. हत्येनंतर आरोपी माॅरीस नरोन्हाने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
बोरिवली येथील आयसी काॅलनी याठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. या शाखेसमोरच माॅरीस नरोन्हा यांचं कार्यालय आहे. माॅरीसला या परिसरात माॅरीसभाई म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या कार्यालयावर देखील माॅरीसभाई असाच उल्लेख आहे.
या घटनेनंतर शुक्रवारी (9 फेब्रुवारी) बोरिवली-दहिसर परिसरात तणावाचं वातावरण आहे. दुकानं बंद आहेत तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे.
माॅरीस यांनी गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांना आपल्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यालयात बोलवलं होतं. महिलांना साडी वाटपाचा हा कार्यक्रम होता असं स्थानिक महिला सांगतात.
संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या जवळपास 50 महिला माॅरीसच्या कार्यालयात पोहचल्या.
'जोरात आवाज आला - भाई को मार डाला'
अभिषेक घोसाळकर हे सुद्धा तिथे होते. त्यांच्यासोबत त्यांचा कार्यकर्ता प्रविण होता. यावेळी फेसबुक लाईव्हसाठी माॅरीसने अभिषेक यांना कार्यालयाच्या आतमध्ये बोलवलं आणि लाईव्हमध्ये आवाज नको म्हणून गर्दी कमी केली. काही मोजकेच लोक आतमध्ये असल्याचं स्थानिक सांगतात.
अभिषेक घोसाळकर आतमध्ये गेल्यानंतर काही मिनिटांमध्ये फेसबुक लाईव्ह संपलं आणि काही सेकंदातच अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना पाच गोळ्या लागल्याचे समजते.
गोळ्यांच्या आवाजामुळे कार्यालयाबाहेर एकच खळबळ उडाली आणि जमलेले लोक सैरावैरा धावू लागले. काही मोजक्या कार्यकर्त्यांनी दरवाजा उघडून आतमध्ये जाण्याचं धाडस केलं.
यावेळी शिवसेनेच्या उप शाखाप्रमुख नीता जगताप तिथेच होत्या. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या,
"कशासाठी बोलवलं याची कल्पना नव्हती. साडी वाटपाचं आम्हाला नंतर कळालं. भाई (अभिषेक घोसाळकर) बाहेरच उभे होते. अचानक वीज गेली. त्यामुळे अंधार होता. काही वेळातच माॅरीसने बाहेर निरोप पाठवला की अभिषेक यांना आत पाठवा. प्रविण हा आमचा कार्यकर्ता घोसाळकर यांच्यासोबत आता गेला. 'भाई को गोली मारा' असं तो ओरडतच बाहेर आला."
"त्यावेळी कोणीही पुढे जायला तयार नव्हतं. आम्ही काही महिला होतो. आम्ही काही कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना उचललं. रिक्षा थांबवली. त्यावेळी ते शुद्धीत नव्हते. त्यांना आम्ही करुणा रुग्णालयात घेऊन गेलो. मी दुसर्या रिक्षात होते आणि त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना फोन केला. त्यांना कळवलं. तसंच पोलीस स्टेशनमध्येही मी फोन करुन सांगितलं.,"
त्या पुढे सांगतात,"गोळ्या झाडल्यानंतर माॅरीस त्यावेळी तिथे आम्हाला दिसला नाही. त्याचा मृतदेह तिथे नव्हता."
दोघांमध्ये वाद काय?
या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे देण्यात आला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार नेमका का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
परंतु माॅरिस आणि अभिषेक यांच्यात जुना वाद होता, असं इथले स्थानिक कार्यकर्ते सांगतात.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं.
"गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याची कायदेशीर मान्यतेची खात्री करून घेतली जात आहे.
घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी दाखल केलं होतं, उपचारांती त्यांचा मृत्यू झालाय. घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम पोलीस पथक करत आहेत. गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याची कायदेशीर मान्यता याची खात्री करतोय. फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील."
दरम्यान, पोलिसांनी माॅरिस याचे सहकारी मेहुल पारिख आणि रोहित साहू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माॅरिस याच्यावर पोलीस स्थानकात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापूर्वी माॅरिस महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात जवळपास सहा महिने तुरुंगात होता. त्याला पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती.
मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्यात कलम 376 नुसार आणि 509 विनयभंग नुसार माॅरिस विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यात अभिषेक घोसाळकर यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची धारणा माॅरिसची होती, असंही काही कार्यकर्ते सांगतात.
या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या पीडित महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांनी मदत केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. या घटनेवरून माॅरिस आणि अभिषेक यांच्यात वाद होता. परंतु तो जामिनावर बाहेर आला.
यानंतर गेल्या सहा महिन्यात माॅरीसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्येही यापुढे 'आपण चांगलं काम करू' असं घोसाळकर बोलत होते.
तसंच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांंनुसार, माॅरिसची राजकीय महत्त्वाकांक्षा देखील होती. त्याला राजकीय पक्षात प्रवेश करायचा होता.
नीता जगताप सांगतात, "माॅरीसच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी भाजपचे मोठमोठे आमदार, नेते आले होते. त्याला राजकीय पक्षात प्रवेश करायचा होता."
माॅरिसच्या समाज माध्यमावरील अकाऊंटवर अनेक नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे बोरिवली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. 2009 ते 2014 या कालावधीत ते शिवसेकडून आमदार होते.
अभिषेक घोसाळकर हे दहिसर कंदारपाडा प्रभाग क्रमांक सातमधून माजी नगरसेवक आहेत. तसंच त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या देखील प्रभाग क्रमांक 6 मधून माजी नगरसेविका आहेत.
तसंच अभिषेक घोसाळकर हे मुंबै बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर विनोद घोसाळकर हे ठाकरे गटात आहेत. बोरिवली, दहिसर या भागात घोसाळकर कुटुंबियांचे राजकीय वर्चस्व आहे.