'ती केस आम्ही ही विसरलो अन् ईडीही विसरली...' काय म्हणाले छगन भुजबळ......

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (20:48 IST)
अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने उच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर यांच्या विरोधात दाखल याचिका मागे घेत असल्याचे सक्तवसुली ईडीने मुंबई उच्च न्यायालयात कळवले आहे.
 
दरम्यान ईडीकडून दिलासा मिळाल्यानंतर छगन भुजबळांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी "ईडीच्या केसमधून सुटलो ही बातमी चुकीची आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी आम्हाला परदेशात जायचं होते. त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अर्ज केला होता. तेव्हा आम्हाला कोर्टाने परवानगी दिली.मात्र त्याला ईडीचा विरोध होता, तेव्हा ईडीने त्या परवानगी विरोधात अपिल केले होते. आता ती केस आम्ही पण विसरलो आणि ईडी पण विसरली..." असे भुजबळ यावेळी म्हणाले.
 
"आम्ही परदेशात जाऊन आलो पण त्यामुळे त्या केसला काही अर्थ राहिला नाही. जी मेन केस आहे ती पण विड्रॉल झाली पाहिजे. आम्ही महाराष्ट्र सदनच्या केसमधून सुटलो आहोत. त्यामुळे ईडीची केस आमच्याकडून काढून घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही कोर्टात लढत आहे.." असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
काय होते प्रकरण?
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना 2016 मध्ये झाली रोजी अटकही झाली होती. तब्बल दोन वर्षांनी उच्च न्यायालयाने भुजबळांना जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या या निर्णयाला ईडीने 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती