पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे. पुण्याचा पारा सरासरी 22 अंशापर्यंत खाली आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 17.3 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.