श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्चपासून बंद राहणार आहे मात्र भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुखदर्शन घेता येणार आहे. या शिवाय मंदिराच्या बाहेर एलईडी स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. आषाढीपूर्वी गाभा-यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही मात्र पाद्यपूजा, तुळशीपूजा बंद राहणार, असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला करण्यात आले आणि मंदिरातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथील काम सुरू झाले. आता श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभा-याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये गाभा-यातील ग्रेनाईट फरशी, ऑईल पेंट, सिमेंट आदी काढून पुरातन रुप दिले जाणार आहे.
या कालावधीत वारकरी संप्रदायाची महत्त्वाची वारी म्हणजे चैत्रीवारी आहे. दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल या वारी कालावधीत मुखदर्शन दिवसभर सुरू राहणार, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली तर हे काम करीत असताना देवाच्या मूर्तीचे संरक्षण केले जाणार आहे.