राज्यातील दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेची संधी मिळणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पुरवणीपरीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. २० ते २९ ऑक्टोबरदरम्यान नियमित शुल्कासह आणि ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज करता येईल.
पुरवणी परीक्षा आणि श्रेणीसुधारसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. श्रेणीसुधारसाठी विद्यार्थ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी मार्च २०२१ अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध असतील. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना फेब्रुवारी मार्च २०२०च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेची माहिती आवेदन पत्रात ऑनलाइन पद्धतीने घेता येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर शाळांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन पैसे भरून त्याची पोचपावती आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे सादर करावी. अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.