उद्धव ठाकरेंचे गुंड पोलिसांच्या हजेरीत मारहाण करतात - किरीट सोमय्या
सोमवार, 25 एप्रिल 2022 (12:48 IST)
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन, आपल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत चौकशी करण्याची आणि कारवाई करण्याची विनंती केली. यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.
किरीट सोमय्या म्हणाले की, "गृहसचिवांबरोबर 20 मिनिटं चर्चा केली. राज्यातील परिस्थितीबाबत माहिती दिली. फक्त धमक्या देत नाहीत तर जीव घेण्याचा प्रयत्न करतात."
"मला मारायचा प्रयत्न होतो, ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं आहे. तीनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिकाराचा दुरुपयोग केला जात आहे. पुण्यातल्या हल्ल्याचं फुटेजही सरकारला दिलं," असंही यावेळी सोमय्यांनी सांगितलं.
ठाकरे सरकारची तक्रार करायला किरीट सोमय्या दिल्लीत
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहसचिवांकडे जाऊन सोमय्यांनी ठाकरे सरकारची तक्रार केली.
दोन दिवसांपूर्वी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात जात असताना, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला किरकोळ दुखापत झाली.
किरीट सोमय्या यांच्यासोबतच्या मुंबई भाजपच्या शिष्टमंडळात आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर, भाजपचे महापालिकेतील नेते विनोद मिश्रा अशा नेतेमंडळांचा समावेश आहे.
हल्ला झाल्याच्या दुसऱ्या दिवशी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता.
ठाकरे सरकारकडून माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न - सोमय्या
"माझ्यावरील हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईचे पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी घडवून आणला", असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. माझा मनसुख हिरेन करण्याचा डाव आहे, असंही ते म्हणाले.
"उद्धव ठाकरे सरकारकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला. खार पोलीस स्टेशनबाहेर 70-80 लोकांचा जमाव कसा जमतो? हल्ला होईल याची कल्पना पोलिसांना दिली होती.
"पोलिसांनी वैयक्तिक जबाबदारी घेतली होती. माझ्या हल्ल्याला पोलीस कमिशनर संजय पांडे जबाबदार आहेत. पोलिसांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहेत. पोलीस स्टेशनच्या दारात एवढी माणसं कसे जमू शकतात. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडून गाडीत बसलो. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला", असं सोमय्या म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "खोटं एफआयआर किरीट सोमय्याच्या नावाने रजिस्टर केलं आहे. हे मॅनिप्युलेटिव्ह फेक एफआयआयआर. तुम्ही सही केली नाही तरी हेच एफआयआर असं सांगण्यात आलं आहे. ही माफियागिरी. सरकारप्रणित हल्ला आहे. पोलिसांशी हातमिळवणी झाली होती".
"केंद्र सरकारने Z सेक्युरिटी दिली आहे. कालच्या हल्ल्यात काच माझ्या हनुवटीला लागली. आणखी वर लागलं असतं तर मी आंधळा झालो असतो. राजीव कुमार चौबा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना चौकशी करायला सांगितलं आहे. भाजप शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे.
वाशिममध्येही माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. कालही माझ्यावर हल्ला झाला. आतापर्यंत तीनवेळा मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्राची जनता माझ्याबरोबर आहे", असं सोमय्या म्हणाले.
"खार पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. कमांडोंमुळे मी आज जिवंत आहे. खार पोलीस स्टेशनच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माझ्याशी चर्चा केली. चहा प्यायलो. तुम्ही सुरक्षित जाऊ शकता असं मला सांगण्यात आलं. माझी गाडी बाहेर आली आणि 70-80 लोकांनी माझ्यावर हल्ला केला", असं सोमय्या म्हणाले.
"काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या, चप्पल फेकण्यात आल्या. दगडफेक करण्यात आली", असं सोमय्या यांनी सांगितलं.