पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी शरद पवारांनी पुण्यातील भिडे वाडा आणि दगडुशेठ हलवाई मंदिर परिसरात भेट दिली. शरद पवार मंदिरात जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र शरद पवारांनी भिडे वाड्याची पाहणी केली आणि दगडुशेठ हलवाई मंदिरात न जाताच पुढे प्रस्थान केलं. त्यामुळे शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल निर्माण होतोय.
शरद पवार मंदिरात का गेले नाहीत असा सवाल केला असता, राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, शरद पवार यांना मंदिरात जाण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, मी आज मांसाहारी जेवण केलेलं आहे. त्यामुळे मंदिरात जाणं योग्य असणार नाही. त्यामुळे शरद पवार हे गाभाऱ्यात न जाताच निघाले. दरम्यान, यावेळी त्यांनी मुखदर्शन घेतल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्विकारल्यापासून त्यांच्या निशाण्यावर शरद पवार होते. शरद पवार हे नास्तिक असून, त्यांचा मंदिरातील किंवा दर्शन घेतानाचा फोटो किंवा व्हिडिओ क्वचितच आढळेल असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना शरद पवारांनी देवदर्शन हा प्रदर्शन करण्याचा विषय नाही असं म्हटलं होतं. तसंच यावरुन राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि बारामतीमधील पवार समर्थकांनी काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले होते. ज्यामध्ये शरद पवार स्वत: आरती करताना दिसत होते. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार आज मंदिरात जाणार का? असा सवाल निर्माण झाला होता.