काँग्रेसचा अंतर्गत गोंधळ नेमका का झाला, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र, यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणाले की, “नाना पटोले जे सांगत आहेत त्याविषयी आम्ही लवकर सविस्तरपणे राजकीय भूमिका मांडू. नाना पटोले जे सांगत आहेत, ते अर्धसत्य आहे. जेव्हा मी सत्य मांडेन तेव्हा सगळेच चकित होऊन जातील.”
“मी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. गेल्या 22 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आलो आहे. आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेस पक्षात 100 वर्षे पूर्ण होतील. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी मागितली होती. मात्र, एबी फॉर्म न मिळाल्यामुळे माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे,” असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
तर उमेदवारीवरून तांबे कुटुंबात वाद आहे, असा दावा नाना पटोलेंनी केला.
“नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने दोन कोरे एबी अर्ज पाठवले होते. ऐनवेळी अशी धोकेबाजी होईल, याची कल्पना नव्हती. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध केला नव्हता. तसे असते तर कोरे अर्ज पाठवले नसते,” असं पटोले म्हणाले.