सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंद

पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाने सफाळे रेल्वे फाटक सात दिवस बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर तेच फाटक कायमचे बंद होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. सफाळे देवभूमी सभागृहातील बैठकीमध्ये सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी सफाळे रेल्वे फाटक 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत बंद होण्याबद्दल माहिती दिली. भविष्यात हे फाटक कायमचे बंद होण्याची चिन्हे आहेत. सुमारे 50 गावांपेक्षा अधिक गावे सफाळे बाजारपेठेची जोडली गेली आहेत. किंबहुना अनेक प्रवासी आणि नागरिक हे पूर्व व पश्चिम दिशेकडून फाटकातून ये-जा करत असतात. जर हे फाटक कायमचे बंद झाले तर येण्या-जाण्यासाठी सुमारे पाच ते सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास अधिकचा करावा लागणार आहे. कपासे येथील रेल्वे ओव्हर ब्रिज हा सध्याचा एकमेव मार्ग पूर्व व पश्चिम दिशेला जोडण्यासाठी आहे.
 
 फाटक कायमचे बंद होणार हे जरी विधीलिखित असले तरी त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णाप्रमाणे सुस्त असल्याचे दिसते. यासाठी स्थानिक आमदार व खासदारांनी लवकरात लवकर पुढाकार घेऊन पादचारी फुल किंवा भुयारी मार्ग अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करावेत,असे डीव्हीपीएसएस सफाळे कमिटीचे अध्यक्ष जतिन कदम यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती