सांगली महापालिकेत अनोखी अभिरुप महासभा पार पडली. या अभिरुप सभेत हे निर्णय घेण्यात आले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेत अनोखी अशी अभिरूप महासभा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त महापौरांच्या खुर्चीत, अधिकारी नगरसेवकांच्या भूमिकेत, तर नगरसेवक अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात बिबट्या, गवा,सांभार या वन्य प्राण्यांचा पकडण्याचे टेंडर काढण्याचा आणि दक्षिण आफ्रिकेकडून चित्ते मागण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभिरुप सभेचे पीठासीन अधिकारी तथा महापौर म्हणून आयुक्त सुनील पवार यांनी काम पाहिले तर आयुक्तांची भूमिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी बजावली.
याच अभिरूप महासभेत महापौर यांच्यासाठी रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याच्या विषयाला नगरसेवकांनी विरोध केला तर ही महागडी वाहने नगरसेवकांच्या मानधनातून न घेता शासनाच्या निधीतून घेण्याची सूचना अभिरुप नगरसेवकांनी केली. यावर अभिरुप सभेचे महापौर सुनील पवार यांनी महापौरांना रोल्स रॉयल किंवा मर्सडीज बेंझ गाडी घेण्याऐवजी हत्ती अंबारीसह आणि उपमहापौर व अन्य पदाधिकारी यांच्यासाठी घोडे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या नगरसेवकांची नोंदणीकृत ठेकेदार वर्ग अ म्हणून नोंदणी करण्यासही मान्यता देण्यात आली.