नवीन नाशिक येथील हॉटेल सोनाली मटण भाकरी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून नाशिकरोडच्या युवकाचा खून प्रकरणातील संशयित आरोपी अतुल सुभाष पिठेकर (१९) याचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.नवीन नाशिकमधील स्टेट बँकेजवळील हॉटेल सोनाली येथे २८ जुलै रोजी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास प्रसाद भालेराव(२५,रा.राजवाडा,देवळालीगाव) हा मित्रांसमवेत जेवण करायला गेला होता.यावेळी अनिल पिठेकर,नीलेश दांडेकर(रा. इंदिरा गांधी वसाहत,लेखानागर) यांच्यासोबत प्रसादचा किरकोळ कारणावरून वाद झाला.
याचा राग मनात धरून पिटेकर व दांडेकर यांच्यासह चार-पाच युवकांनी हॉटेलबाहेर शनी मंदिरासमोर प्रसादला मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला गंभीर जखमी केले.त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.याप्रकरणातील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान यातील संशयित आरोपी अतुल सुभाष पीठेकर हा मध्यवर्ती कारागृहात अटकेत होता.