लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार करणार्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी विशाल जगदीश परदेशी (वय ३७, रा. नाशिकरोड) याने पीडित महिलेशी दि. १ ऑक्टोबर २०२० ते दि. ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले, तसेच लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर चुंचाळे घरकुल योजना, तसेच दातीरनगर येथे मित्राच्या घरी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले.
दरम्यान, पीडित महिलेने आरोपी विशाल परदेशी याला लग्नाबाबत विचारले असता त्याने त्यास नकार दिला, तसेच “तू हलक्या जातीची आहेस, तुला घरी नेले तर समाजात आमची बदनामी होईल,” असे म्हणून लग्नास टाळाटाळ केली. अखेर पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात आरोपी विशाल परदेशी याच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त शेख करीत आहेत.