शिरपुरात महिलेचा गळा दाबून खून

बुधवार, 17 मे 2017 (10:54 IST)
शहरातील गणेश कॉलनीतील एका महिलेचा गळा दाबून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. ओळख लपवण्यासाठी मारेकर्‍यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्हीचा रेकॉर्डर पळवून नेला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. येथील गणेश कॉलनीत राहणार्‍या नफिसाबी दीदार खाटीक (40) यांचा मृतदेह काल दुपारी घराच्या शौचालयात आढळला.
 
त्यांचे हात व पाय दोरीने बांधून नळाला बांधलेले होते. त्यांना ओढणी व दोरीच्या साह्याने गळफास लावल्याचे दिसून आले. खाटीक यांच्या घरात एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्यांचे रेकॉर्डिंग करणारा डीव्हीआर संशयितांनी काढून नेला. दीदार तथा राजू भिकारी खाटीक यांचा खेड्यापाड्यांवर अंडी, बोंबिल होलसेल विक्रीचा व्यवसाय आहे.
 
ते घटनेच्या वेळेस आपले बॉलेरो कँपर वाहन घेवून वाघाडी, वाडी, बोराडी, कोडीद येथे गेले होते. त्यांची दोन्ही मुले येथील मच्छीबाजारातील दुकानावर बसतात.
 
डॉ.शकील यांच्याकडे लग्नसोहळ्यासाठी आई नफीसाबीला सोडून मुलगा आतिफ हा दुकानावर गेला. तो दुपारी अडीचला घरी गेल्यावर दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. तिचा फोन किचन ओट्यावर पडला होता. नफीसाबी घरात न दिसल्याने त्याने काकू सायराबी व भाऊ अरबाज यांना बोलावले.
 
ते घरी आल्यावर पाहणी केली असता घराच्या शौचालयात नफीसाबीचा मृतदेह आढळला. शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात नेल्यावर तिच्या मृत्यूचे निदान करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा