नागपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजाऱ्यांमध्ये जागेवरून वाद पेटला आणि हा जागेचा वाद जीवावर बेतला आहे. घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच महिलेची चाकू भोकसून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नागपूरच्या रामबाग परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आरती निकोलस असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार रामबाग परिसरात घडला आहे. या भागात आरती निकोलस आणि बादल कुमरे हे एकमेकांच्या शेजारी राहत होते. बादलच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी त्याने आपल्या राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून एक झोपडी शेजारील जागेचे अतिक्रमणकरीत बांधली होती.
मात्र, त्या झोपडी मध्ये आरतीला दुकान लावायचे होते, त्यामुळे तिने त्या झोपडीची मागणी केली आणि बादलला ती जागा सोडण्याचा हट्ट केला. मात्र बादल ती जागा सोडण्यास तयार नव्हता. या कारणावरून त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद सकाळच्या सुमारास झाला होता, नंतर त्यांच्यात मध्यस्ती झाली. सर्वांना वाटले प्रकरण निवळले पण, त्यानंतर बादल अचानकपणे आला त्याने आरती वर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली, यात आरती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी आरतीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.