महानगरपालिका निवडणुकांसाठी 10 ते 5 लाखांची खर्च मर्यादा
गुरूवार, 2 फेब्रुवारी 2017 (09:24 IST)
महानगरपालिका निवडणुकांतील उमेदवारांसाठी खर्चाची सुधारीत मर्यादा 10 ते 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे; तसेच जिल्हा परिषदांच्या उमेदवारांसाठी 6 ते 4 लाख आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांकरिता 4 ते 3 लाख रुपयापर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सुधारीत खर्च मर्यादेनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 10 लाख रुपये एवढी खर्च मर्यादा असेल. अन्य महानगरपालिकांच्या बाबतीत संबंधित महानगरपालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या प्रमाणानुसार उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीदेखील याच सूत्राप्रमाणे उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांकरिता खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ‘अ’ वर्ग महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी 5, ‘ब’ व ‘क’ वर्ग महानगरपालिकेसाठी 4; तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकेसाठी 3 लाख रुपये खर्च मर्यादा होती. जिल्हा परिषदांसाठी 3 लाख; तर पंचायत समित्यांच्या उमेदवारांसाठी 2 लाख रुपये खर्च मर्यादा पूर्वी होती, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.