येत्या 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने मुंबईतील सम्राट हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाईल. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता. म्हणून मुंबईतील महामोर्चा ९ ऑगस्टला काढणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले. या मोर्चासाठी वातावरणनिर्मिती व्हावी यासाठी ६ जूनला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे निमित्त साधत गावोगावी महामोर्चाची माहिती देण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले जाणार आहे. तर १३ जुलैला कोपर्डी येथील क्रांती ज्योतीला श्रद्धांजलि वाहून अभियानाचा आढावा घेतला जाईल. दरम्यान, सरकारला हुंडाबंदी, शेतकऱ्यांच्या विषयांना आणि आंदोलनांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे समन्वय समितीने यावेळी सांगितले. त्याबरोबरच यंदाच्या शैक्षणिक वर्षात मराठा विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफीसह उच्च शिक्षणात सवलत देण्याची मागणी केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.