ठाणे : बऱ्याचजणांच्या विकेट काढायच्या आहेत, असे सुचक विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केले. लोकांमध्ये गेल्याशिवाय त्यांचे प्रश्न कळत नाहीत. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन काम करतोय, असे सांगत घरात आणि कार्यालयात बसून सरकार चालविता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यानंतर झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री आणि नागरिक हे वेगळे आहेत, असे मी मानत नाही. आपण सर्व एकच आहोत. मी तुमच्यातीलच मुख्यमंत्री आहे. आमदार आणि खासदार हे लोकांमध्ये जात नाहीत, तोपर्यंत त्यांना नागरिकांचे प्रश्न कळत नाहीत. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन काम करतोय, असे सांगत घरात आणि कार्यालयात बसून सरकार चालविता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.