पक्षात वहिनींचा हस्तक्षेप वाढला होता; शिंदे गट आमदाराचा रश्मी ठाकरेंवर रोख

गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (09:19 IST)
बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, उलट त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले, मात्र शिवसेना पक्षात वहिनींनी (रश्मी उद्धव ठाकरे) कळत-नकळत हस्तक्षेप केला असल्याचा आरोप शिंदे गट आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. वहिणींसोबतच मेव्हणे, भाचे यांचा देखील पक्षात हस्तक्षेप वाढला होता यामुळेच त्यांच्यापासून अनेक कार्यकर्ते दुरावले गेले असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोगावले सांगत होते.
 
यावेळी भरत गोगावले म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णयात माँसाहेबांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. म्हणून माँसाहेबाप्रती शिवसैनिकांचा आई-वडीलांपेक्षाही जास्त आदर तयार झाला. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण होण्याची कारणे तपासली पाहीजेत. एक किंवा दोन नाही तर तब्बल 40 आमदार, 13 खासदार, शेकडो नगरसेवक, हजारो कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. तेही सत्ता असताना पक्षाला सोडून गेले, याचे कुठेतरी चिंतन करायला हवे.” असे गोगावले म्हणाले आहेत.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे आमच्या अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, मतदारसंघातील समस्या घेऊन जात होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार करायचो, तेव्हा उद्धव ठाकरे त्याकडे गांभीर्याने पाहत नसत. कोणताही निर्णय घेत नसत. मग हळूहळू आमच्या भावना तयार होत गेल्या की, यांना आमची गरज नाही. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि माझे कुटुंब एवढ्यापुरतेच ते मर्यादीत राहिले होते.” असे गोगावले म्हणाले.
 
गोगावले यांचा आरोप
 
“उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय पक्ष संघटनेत हस्तक्षेप करायला लागले होते. त्यांचे मेव्हणे, भाचे आणि वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करत होत्या” असा आरोप गोगावले यांनी केला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती