मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका मागील महिन्यात पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल झाली आहे. या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी सेवा कालावधी वाढविण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त आणि एमएमएमओपीचे अध्यक्ष एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.
अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वदरम्यान दोन फेऱ्या वाढणार आहेत. एक रात्री २२.२० वाजता आणि एक रात्री २२.३० वाजता अशा या वाढीव फेऱ्या असतील. गुंदवली ते डहाणूकरवाडी मार्गे दहिसर पूर्वदरम्यानही दोन फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री २२.२० आणि २२.३० या वेळेत या वाढीव फेऱ्या होतील. एमएमएमओपीएलच्या निर्णयानुसार मंगळवारपासून या अतिरिक्त फेऱ्या सुरू होणार असल्या तरी हा निर्णय पुढील दोन महिन्यांपुरता असणार आहे. पुढे हीच वेळ कायम ठेवायची की वेळ वाढवायची, कमी करायची याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. नव्या वेळापत्रकानुसार आता गुंदवलीहून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी रात्री २१.३० वाजता, गुंदवलीहून डहाणूकरवाडीसाठी शेवटची गाडी रात्री २२.३० वाजता सुटणार आहे. गुंदवलीसाठी अंधेरी पश्चिमेकडून शेवटची गाडी रात्री २१.३० वाजता, अंधेरी पश्चिमेकडून दहिसर पूर्वेसाठी शेवटची गाडी रात्री २२.३० वाजता, दहिसर पूर्वेकडून अंधेरी पश्चिमेसाठी शेवटची गाडी २२.०३ वाजता, दहिसर पूर्वेकडून गुंदवलीसाठी शेवटची गाडी रात्री २२.०८ वाजता, डहाणूकरवाडीसाठी दहिसर पूर्वेकडून शेवटची गाडी रात्री २३.११ वाजता सुटणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor