काँग्रेसच्या स्वार्थामुळेच शरद पवार यांना पंतप्रधान होता आले नाही असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात येत असून जर मोदींना इतकीच चिंता असेल तर त्यांनी शरद पवारांना पंतप्रधान करावे असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. नाशिक येथे आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पटोले यांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आगमन झाले यावेळी ते बोलत होते.
उध्दव ठाकरे यांनी भाजप सोबत युती तोडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या बैठकीत केला याबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, मोदींनी यावर बोलण्यापेक्षा मणिपुर जळतयं त्यावर बोलायला पाहिजे, संपूर्ण देश बेरोजगार करण्याचे जे पाप यांनी केले त्यावर बोलायला हवे, अन्नदात्या शेतकर्यांच्या विरोधात तीन काळे विधेयक आपण आणले त्यावर बोलावे, महागाई, गरीबीवर बोलावे. निदान मोदींनी पंतप्रधान पदाच्या खुर्चीची प्रतिष्ठा जपायला हवी. लोक नऊ वर्षांपासून तुम्हाला ऐकत आहेत. आता तर लोक मन की बात ऐकायला तयार नाहीत. सामनात काय लिहीलयं, बंद खोलीत काय चर्चा झाली तो आताचा विषय होऊ शकत नाही. देश पेटत असतांना पंतप्रधानांनी राजकीय वक्तव्य करू नये असे ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात जे सर्वे येत आहेत यात एनडीएला सर्वाधिक जागा मिळत असल्याचे दिसते याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, जनता वाट पाहात आहे. एकदा निवडणूका लागू द्या सगळे सर्वे उलटे फिरतील. कर्नाटक, हिमाचलमध्येही सर्वे पलटले. त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे हे काँग्रेसला माहित आहे. जनतेच्या मनात काँग्रेस आहे. जेव्हा जनतेच्या कोर्टात चेंडू जाईल तेव्हा ते महाविकास आघाडीला सत्तेत पाठवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मन की बात करणार्यांना लोकांच्या भावना कळणार नाही.