'हवे पंख नवे' सारख्या नाटकांतून तरुणाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावेत

गेल्या चार दिवसापासून नाशिक शहरातील पसा नाट्यगृह येथे सुरु असलेल्या 3ऱ्या बोधी कला संगितीत  बोधी नाट्य परिषद निर्मित 'हवे पंख नवे' हे नाटक सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुणाईशी बोलताना भारताचा सिंधू संस्कृती ते आधुनिक काळापर्यंतचा ८००० वर्षांचा इतिहास उलगडतात. डॉ. आंबेडकर आज हयात असते या देशाला आणि जनतेला उद्देशून काय म्हणाले असते याचे दर्शन यात घडते. हा देश जगातील सर्वोत्तम पदी आरूढ व्हावा असे एक स्वप्न पाहतानाची तरुणाई या नाटकाच्या माध्यमातून आपल्या समोर येते.
 
बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि कार्याचे वर्णन करताना महत्वाचे म्हणजे या नाटकामध्ये 1927 साली झालेला महाडच्या 14 ताळ्यावर झालेला संघर्ष, काळाराम मंदिर सत्याग्रह, गांधीजींबरोबर झालेला पुणे करार, शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांचे केले कौतुक, मजूर पक्षाची स्थापना ते भारतीय राज्यघटनेची निर्मिती सोबतच रमाबाई आंबेडकर यांचे जीवनदर्शन त्याचप्रमाणे त्यांची दुसरी पत्नी माईसाहेब आंबेडकर आणि माईसाहेबांनी डॉ. आंबेडकरांसाठीकेला त्याग यांचे मनोज्ञ दर्शन घडते.
 
या नाटकाचे दिग्दर्शन अशोक हंडोरे यांनी केले असून नाटकातील रमाबाईच्या मृत्यूचा प्रसंग अतिशय मनोज्ञ असा साकारण्यात आला आहे. नाटकास संगीत आणि नेपथ्य हंडोरे यांचेच लाभले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेत विक्रांत शिंदे तर रमाबाई आणि माईसाहेबांनी भूमिकाही क्षमा वासे यांनीच साकारली आहे. तसेच गांधीजी यांच्या भूमिकेत ज्ञानेश्वर सपकाळ, शाहू महाराज यांचे पात्र निखिल जाधव यांनी रंगविले आहे. नाटकास प्रकाश योजना आकाश पाठक, संगीत संयोजन राहुल कदम, रंगभूषा शशी सकपाळे याशिवाय एकता कासेकर, प्रज्ञा जावळे, वर्षा काळे, विरेश जगताप यांनी भूमिका केल्या आहेत. नाट्य निर्मिती बोधी नाट्य परिषदेची आहे.
 
प्रतिक्रिया : 
8000 वर्षाचा इतिहास सांगताना सिंधू संस्कृतीचे दर्शन घडवून आणताना आजच्या समाजाने सर्व प्रकारचे कष्ट केले पाहिजेत असा आग्रह धरणारे हे नाटक आहे. संपूर्णपणे मुक्तछंदात लिहिले हे नाटक असून एकाचवेळी या नाटकात कविता कथा कादंबरी आणि नाट्य अशा सर्व वाङ्मयीन घटकांचे मूल्यभान राखलेले आहे. यामुळे या नाटकाचे काव्यनाट्यांबरी म्हणू शकतो. -- प्रेमानंद गज्वी, लेखक, नाटककार, हवे पंख नवे या काव्यनाट्यांबरीचे लेखक
 
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांच्या मनोगताने संगितीचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना कसबे म्हणाले की,  सादर कण्यात आलेल्या भगवान हिरे लिखित काजवा या एकांकिकेने अनेक प्रश्न उपस्थित करण्याचे काम केले. यातील प्रश्न भारतीयांना अंतर्मुख करणारे आहेत. व्यवस्थेचा दबाव सर्वसामान्य माणसावर कसा असतो याचे परखड विश्लेषण यात आले आहे. संस्कृतीच्या कुंपणाला धडका मारून तरुणांनी विचार आणि प्रयत्न करायला हवेत असे चित्रण त्यात आहे.
 
 सादर करण्यात आलेल्या 'हवे पंख नवे' या काव्यनाट्यांबरीतून या प्रश्नाची उकल झाली. प्रेमानंद गज्वी यांचे हे नाटक एकार्थाने बाबासाहेबांचे  विचार त्यांनी स्वतःच मांडले आहेत. आणि बाबासाहेबंबाद्दल्च्या ज्या अनेक भ्रामक समजुती समाजामध्ये पसरलेल्या समजुती नष्ट करण्याच्या दृष्टीने आणि विवेकवादाच्या दृष्टीने बाबासाहेबांकडे बघण्याचा दृष्टीकोन या नाटकातून मिळतो. या नाटकातून डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घटना सर्वसामान्यांना कळतात. बोधी कला संगिती सारखे संमेलने मोठ्याप्रमाणात व्हायला हवीत अशी अपेक्षा डॉ. कसबे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी नाटककार आणि बोधी संगितीचे प्रेमानंद गज्वी, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य चे सदस्य शशिकांत सावंत, बोधी संगितीचे भगवान हिरे, राज बाळवदकर, अशोक हंडोरे, डॉ. सुरेश मेश्राम आणि मोठ्या संख्येनं प्रेक्षक-श्रोते उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती