5 वर्षाचा चिमुकला 19 तासांनी ढिगाऱ्याबाहेर

बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (08:11 IST)
महाड इमारत दुर्घटनेनंतर 19 तासांनी ढिगाऱ्याखासून एका पाच वर्षीय चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. या चिमुकल्याचं नाव मोहम्मद बांगी असं आहे. मोहम्मदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची आई नौशिन नदीम बांगी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
 
नौशिन नदीम बांगी यांचे पती परदेशी नोकरीला आहेत. नौशिन या त्यांच्या तीन लहान चिमुकल्यांसह इमारतीत वास्तव्यास होत्या. यामध्ये एक लहान मुलगा तर दोन लहान मुलींचा समावेश आहे. यापैकी मुलगा मोहम्मद आणि त्याची दोन वर्षीय लहान बहीण रुकय्या सापडले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मोहम्मदची बहीण आयशा हीचा शोध सुरु आहे.
 
महाड शहरातील काजळपुरा भागात सोमवारी पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. या इमारतीच्या मलब्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 60 जणांना बाहेर काढलं असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही 18 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती