सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?”; फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (16:20 IST)
भाजपा नेत्या पंकजा मुंडे काही ना काही कारणाने सतत चर्चेत असतात. आताही त्यांची चर्चा सुरू झाली आहे ते त्यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे.पंकजा सध्या त्यांच्या नेहमीच्या सामाजिक,राजकीय भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका बजावत आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमधून त्या बॉस्टनमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये पंकजा म्हणतात, “हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?”.मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे आणि ती भूमिका मी नेहमी आवडीने बजावत असते. किमान पुढचे 8 ते 10 दिवस मी १०० टक्के माझ्या आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये आहे.

आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या होस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे. आर्यमनची १० वी झाली, १२ वी झाली.पण मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही.10 वीच्या परीक्षा चालू होत्या तेव्हा एकाही पेपरसाठी मी उपस्थित नव्हते कारण तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.आता लेकरू ४ वर्ष नाही म्हणून संपूर्ण वेळ त्याला देत आहे.म्हणून कशावर काही टिप्पणी न करता राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी बघत आहे. तरीही इथे देखील घडले असे की मध्यप्रदेशच्या लोकांनी मला डाळ बाटीच्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोचले.विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे.

त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले,खूप बोलले, अनेक कार्यक्रम ही ठरले. शेवटी इथे ही नाही म्हणाले तरीही बीजेपी च्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच पण पार्ट टाईम. कारण प्रायोरिटी आर्यमन आहेच.”

आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे म्हणतात, “आज जन्माष्टमी साजरी होत आहे तिथे जात आहे. सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल मध्य प्रदेशमधली ७५ गावं स्मार्ट करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. लहान मुलांनी आपल्या पॉकेटमनीमधून मधून ७५ सेंट्सपासून ७५ डॉलर्सपर्यंत रक्कम रोज ७५ दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशनसाठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना लॅपटॉप्स किवा स्मार्टफोन्स देण्याचा प्लॅन तयार केला आहे. अनेक अशा गोष्टी पाहून मी आनंदी झाले.

नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवा ही जिभेवर रेंगाळत आहे. जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने…! माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले…!” पंकजा यांच्या या पोस्टची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती