एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार

गुरूवार, 6 जुलै 2023 (07:53 IST)
Eknath Shinde will be the Chief Minister of the state शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाणार, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. या चर्चांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
आज माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'राज्य सरकार एकदम सुरळीत सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात कुठलीही अस्वस्थता नाही. आम्हीही पूर्वी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षातून सरकारमध्ये आलो. का आलो, तर एकनाथ शिंदे आमच्या पूर्वीच्या भाजप-शिवसेना नैसर्गिक युतीत आले. युतीत आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. देवेंद्र फडणवीस एक पाऊल मागे आले आणि राज्याच्या भल्यासाठी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.  
 
आता यात काही किंतू-परंतू करण्याची गरज नाही. राज्य एकदम सुरळीत चालू आहे. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच कुठे येतो. विरोधकांकडून फक्त संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी जबाबदारीने सांगतोय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि 2024 पर्यंत तेच राहतील, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती