कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.राज्य सरकार आणि महापालिकेच्या या निर्णयानंतर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं नेमकं कारण काय आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालतं. मग लोकांना बंधन का, असा सवाल उपस्थित करत कोण कुठे पार्ट्या करतं, हे सर्वांना माहीत आहे, अशी टीकाही संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस महालक्ष्मी रेसकोर्स येथे नुकताच साजरा झाला. त्या पार्टीला अदानी-अंबानी यांच्यासह मुख्यमंत्रीसुद्धा सहकुटुंब उपस्थित होते. कोरोना तिथे फिरकला सुद्धा नाही. मात्र सामान्य जनतेच्या पार्ट्यांमध्ये तो हमखास येतो. मुंबईकर नव्हे, पण हा कोरोना खूप डॅम्बिस आहे, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.