नागपूर : सतत दुष्काळाचा सामना करणा-या मराठवाड्यातील शेतक-यांसाठी मागेल त्याला शेततळे ही योजना उपयोगी असली तरी फारच कमी शेतक-यांना याचा लाभ मिळत असल्याबाबत काँग्रेस सदस्य धिरज देशमुख आज विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या वर उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी व रोजगार हमी विभागामार्फत राबवण्यात येणा-या या योजनेत बरीच तफावत असून ती दूर करून अधिक शेतक-यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी सुधारणा करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
धिरज देशमुख यांनी हा प्रश्न उपस्थित करताना शेततळ्याची मागणी करणा-या शेतक-यांपैकी 10 टक्के शेतक-यांनाही या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणले. बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, प्रकाश सोळुंके आदी सदस्यांनीही या योजनेतील त्रुटी दाखवून देताना शेततळ्यासाठी मिळणा-या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली तसेच मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात येऊन धरणांच्या कमांड एरियात विहीर घेण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी उपस्थित झालेल्या उपप्रश्नांना उत्तर देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले.