सहकार मंत्र्यांचा ‘तो’ बंगला जमीनदोस्त करा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील वादग्रस्त बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. देशमुख यांचा बंगला महापालिकेच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आला आहे. या बंगल्याची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सहकार मंत्र्यांचा हा बंगला जमीनदोस्त करावा तसेच सहकार मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
 
मुंडे पुढे म्हणाले की हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता म्हणूनच इतक्या उशिरा याबाबत आयुक्तांचा अहवाल आला आहे. कोर्टाने आदेश दिले म्हणून आयुक्तांना अहवाल सादर करावा लागला. जर कोर्टात हे प्रकरण गेले नसते तर कदाचित हे प्रकरणही सोयीस्कररीत्या दाबण्यात आले असते, असा आरोप मुंडे यांनी केला. राज्याच्या नगरविकास खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे. हा विषय नगरविकास खात्याअंतर्गत येतो, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणात कोणती भूमिका घेतात ते पहायचे आहे. जी कारवाई एकनाथ खडसेंवर झाली तीच कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुभाष देशमुख यांच्यावर करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत त्यामुळे यांचा पारदर्शक कारभार गेला कुठे असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती