महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये जाऊन प्रचारसभेला संबोधित केलं. या मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडलं आहे. आपल्या राज्यातील उद्योग पळवणाऱ्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातील मंत्री प्रचार करत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “मला सकाळी बातमी कळली की, आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणून ही बैठक रद्द करण्यात आली. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळाकडे महाराष्ट्रातील प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी एक तासही नाही,” असं मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका करताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले “सत्ताधारी पक्षातील सर्व मंत्री गुजरातमध्ये निवडणुकीत व्यग्र आहेत. आधी यांनी गुजरातमध्ये आमदार पाठवले, नंतर प्रकल्प पाठवले आणि आता मंत्रीमंडळ पाठवलं आहे. दुसरीकडे यांच्याकडे महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही.”