राज्यात ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

शनिवार, 12 जून 2021 (08:46 IST)
१४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर शाळा ऑनलाईन की ऑफलाईन सुरू होणार यासंदर्भात संभ्रम असला तरी १५ महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची उजळणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी विशेष ब्रीज कोर्स निश्चित केला असून, ब्रीज कोर्सच्या माध्यमातून ही उजळणी १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
 
विद्यार्थ्यांनी वर्षभरात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य किती विकसित केले आहे याची चाचपणी करण्यासाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. या उजळणीमध्ये एखादा विद्यार्थी पुढील वर्गामध्ये जात असताना त्याला मागील वर्गातील अभ्यास कितपत समजला आहे. तसेच पुढील वर्गासाठी आवश्यक असलेले मागील वर्गातील धडे यांची उजळणी घेण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ब्रीज कोर्सच्या माध्यमातून पहिले ४५ दिवस मागील इयत्तेचा अभ्यासक्रम शिकवून त्याची उजळणी घेऊन त्यावर एक पेपर घेण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्याने किती कौशल्ये प्राप्त केली याची चाचणी करण्यात येणार आहे. ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्याने गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती