सध्याची आकडेवारी अजित पवारांच्या बाजूने
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या विधानसभा मतदारसंघांमधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक वातावरण दिसून येतं. दौंडमध्ये भाजपचे राहुल कूल, इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भारणे, बारामतीत स्वत: अजित पवार, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत. म्हणजेच, सहापैकी चार आमदार अजित पवार जो उमेदवार देतील, त्याच्या बाजूने असतील. पुरंदर आणि भोरमध्ये अनुक्रमे संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातली आमदारांची ताकद सुप्रिया सुळेंच्या विरोधात असल्याचं आकडेवारीवरून दिसतं. मात्र, या मतदारसंघातील भाजपचा मतदार घड्याळावर मत देईल का, याबाबत अनेकांना शंका वाटते. तरीही भाजप या मतदारांना कशाप्रकारे सुप्रिया सुळेंविरोधात मत देण्यास तयार करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचसोबत, सुनेत्रा पवारांचा जय किंवा पराजय हा अजित पवारांचा जय-पराजय असेल, त्यामुळे अजित पवार त्यांची राजकीय ताकद पणाला लावतील, यात शंका नाही आणि अजित पवारांच्या या ताकदीला सुप्रिया सुळे कशा पद्धतीने आव्हान देतील, हे पाहावं लागेल.