भूषण नामदेव पाटील (रा. कसबा ता. भडगाव जि. जळगांव) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील आहे. या युवकाच्या गावातील ग्रामपंचायतच्या नावावर असलेल्या सरकारी जमिनीवर अवैधपणे उत्खनन झालेले आहे. या संदर्भात अनेक वेळा अर्ज आणि निवेदनं देऊनही तोंडी आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही. असा आरोप त्याने केला असून न्याय मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं देखील त्याने म्हटलं आहे.
युवकाच्या सांगण्यानुसार त्यांनी या प्रकरणात ८ /२/ २०२२ रोजी याप्रकरणी पहिलं निवेदन दिलं होतं. त्यानंतर अनेक निवेदन देऊन देखील या अवैधपणे होणाऱ्या उत्खननावर कोणत्याही प्रकारे कारवाही झाली नाही, असा त्याचा आरोप आहे. दरम्यान जळगाव जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही म्हणून या युवकाने नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या उत्खननामागे राजकीय लोकांचा हात असल्याचा गंभीर आरोपही त्याने केला आहे. दरम्यान प्रकरणातील गुन्हेगारांवर जमिनीचे मोजमाप करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे त्याने केली आहे.