दोन वर्षांपासून बंद अंगणवाड्याही उघडणार

शनिवार, 12 मार्च 2022 (16:40 IST)
कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाड्या बंद होत्या. आता मात्र शासन स्तरावरून अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे. बालकांना गरम ताजा आहार पुन्हा मिळणार आहे, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज विधान परिषदेत दिली आहे.
 
विधान परिषदेत आमदार रणजित पाटील यांनी अंगणवाडीतील बालकांना गरम ताजा आहार केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला असताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोविड काळात अंगणवाड्या सुरू ठेवणे आणि बालकांना आहार देणे शक्य नव्हते, त्यामुळे सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला होता. गरम ताज्या आहाराच्या ऐवजी बालकांना त्यांच्या घरापर्यंत पोषण आहार मिळेल याची तजवीज केली. यासाठी सरकारने टेक होम रेशन ही योजना सुरू केली होती आणि या योजनेद्वारे गेली दोन वर्षे नियमितपणे राज्यातील लाखो अंगणवाडी बालकांना पोषण आहार पोचवण्यात आला.
 
त्यांनी म्हटले की आता कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आली असून अंगणवाड्या येत्या दोन दिवसात सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत. अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर बालकांना पुन्हा गरम ताजा आहार दिला जाईल. यासाठी 45 निविदा काढण्यात आल्या आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून बालकांना पुन्हा एकदा सकस गरम ताजा आहार अंगणवाड्यांच्या माध्यमातून दिला जाईल, अशी ग्वाही ठाकूर यांनी सभागृहात दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती